शरद पवार देखील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत : तेजस्वी यादव

sharad pawar, rahul gandhi and tejswi yadav

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील असल्याचा दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. फक्त राहुल गांधीच नव्हे तर विरोधी पक्षांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आणि बसपच्या प्रमुख मायावती हे देखील या शर्यतीत असल्याचा दावा यादव यांनी केला आहे. तेजस्वी यादव यांच्या या दाव्यामुळे कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्या स्वप्नांना मात्र सुरुंग लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 2019च्या निवडणुकीत जर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असा ठराव करण्यात आला होता. काँग्रेसच्या या ठरावावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी यावर थेट प्रतिक्रिया देत काँग्रेसला सूचक इशारा देखील दिला आहे.

नेमकं काय म्हणाले तेजस्वी यादव ?

मोदी सरकारच्या विरोधात लढताना सर्व विरोधकांच्यावतीने पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी हे एकमेव नेते नाहीत. सर्व विरोधी पक्ष एकत्र बसून चर्चा केल्यानंतरच पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल. राहुल गांधी हे एकटे नेते नाहीत जे या शर्यतीत आहेत.विरोधी पक्ष सर्वसहमतीने ज्या व्यक्तीचे नाव निश्चित करतील त्याला राष्ट्रीय जनता दल पाठिंबा देईल. आम्हाला अशी व्यक्ती पंतप्रधानपदी हवी आहे की देशाच्या घटनेचे संरक्षण करेल. राहुल गांधी त्यापैकी एक असू शकतील मात्र विरोधी पक्षांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि बसपच्या प्रमुख मायावती हे देखील या शर्यतीत आहेत.