…तर आक्रमक प्रचार करा; शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

नवी दिल्ली : भाजपने ‘संपर्क फॉर समर्थन’च्या अंतर्गत देशातील दिग्गजांच्या भेटीगाठी घेऊन लोकसभा निवडणुकींची मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या या ४५ मिनिटाच्या चर्चेत पवार यांनी राहुल यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आक्रमक प्रचार करण्याचा सल्ला दिला आहे.

राहुल गांधी यांना शरद पवारांना भेटायचं होतं. त्यामुळे पवार दिल्लीत एका दिवसासाठी आले होते. पवार दिल्लीत आल्याचं कळल्यावर राहुल यांनी पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.दिल्लीत पार पडलेल्या या बैठकीमध्ये या दोघांमध्ये बंद दाराआड सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपविरोधात आगामी डावपेच आखण्यावर या भेटीत प्रामुख्याने जोर देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.