वंदे मातरम एका ओळीत संपवायला सांगितले, राहुल गांधींकडून ‘वंदे मातरम’चा अपमान

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून कॉंग्रेस आणि भाजप एकमेकांची अक्षरशः पिसे काढत आहेत. कर्नाटकमधील एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा अपमान केल्याचा खळबळजनक आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडीओ शेअर करत ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘वेल डन राहुल गांधी’ असं लिहिलं आहे. काँग्रेसने मात्र भाजपावर टीका करत खोटा व्हिडीओ पसरवला जात असल्याचा दावा केला आहे.

काय आहे या व्हिडियोमध्ये
या व्हिडीओत कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के सी वेणुगोपाल राहुल गांधी यांना वंदे मातरमसाठी उभं राहण्यासाठी सांगत असताना, राहुल गांधी मात्र घड्याळ दाखवत लवकर करा असं सांगत आहेत. यानंतर वेणुगोपाल यांनी वंदे मातरम गाणाऱ्या व्यक्तीला एका ओळीत संपवून टाकायला सांगताना दिसत आहेत.

अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की ‘राहुल गांधी यांनी प्रचारसभेत वंदे मातरम लवकरात लवकर संपवण्यास सांगितलं’. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनीही राहुल गांधीवर टीका करत ट्विट केलं आहे की, ‘कर्नाटकमध्ये एका प्रचारसभेदरम्यान राहुल गांधींनी एका लाइनमध्ये वंदे मातरम संपवण्यास सांगितलं. म्हणून आम्ही त्यांना शहजादा म्हणतो. हा देश ते आपली खासगी संपत्ती समजतात. ते राष्ट्रीय गीत बदलू इच्छितात का ?’ असा थेट सवाल भाजप कडून उपस्थित करण्यात आला.