नरेंद्र मोदींनी देशात तिरस्कार आणि विभाजनाचं विष पसरवलं आहे : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाड दौरा काढला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टोलेबाजी केली. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तिरस्कार आणि विभाजनाचं विष पसरवलं असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाबाबत बोलताना पातळी सोडली. त्यांच्या भाषणातून फक्त राग आणि द्वेष पसरवला जात होता. आम्ही राष्ट्रीय पातळीवर विष पसरवणाऱ्या एका माणसाशी लढत होतो, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

वायनाडमधल्या मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसंच वायनाडच्या प्रत्येक नागरिकासाठी काँग्रेस पक्षाचे दरवाजे सदैव उघडे आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळच्या वायनाडमध्ये आले आहेत. या ठिकाणी ते तीन दिवस दौरा करणार आहेत. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाडच्या कालपेट्टा या ठिकाणी रोड शो केला.