राहुल गांधीच्या विमानाचे आकाशात हेलकावे; घातपात झाल्याचा संशय

हुबळी: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाने अचानक आकाशात हेलकावे घेतल्याची घटना घडली आहे, हा तांत्रिक बिघाड आहे कि घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गांधी हे काल दिल्लीवरून कर्नाटकातील हुबळी येथे गेले होते. विमान आकाशात असताना अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला, यामध्ये घातपाताची शक्यता वर्तवत काँग्रेसकडून कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे संबंधित वैमानिक आणि विमानाला ताब्यात घेत चौकशी केली जात आहे.

काल राहुल गांधी हे प्रचार दौऱ्यासाठी हुबळी येथे आले होते. यावेळी विमानामध्ये त्यांच्यासह चारजण प्रवास करत होते, हे विमान ठरलेल्या वेळेनुसार ११ वाजून ४५ मिनिटांनी हुबळीत पोहोचणार होते. मात्र 10:45 च्या सुमारास विमान अचानक एका बाजूला झुकले आणि खाली आले. यावेळी वेगळा आवाजही झाला. विमानातील ऑटो पायलट मोड निकामी झाल्याचेही त्यावेळी लक्षात आले. हवामान सामान्य असतानाही असा प्रकार घडल्याने सगळेच चक्रावून गेले. दरम्यान, राहुल गांधी यांच्यासोबत प्रवास करणारे कौशल विद्यार्थी यांनी याबदल तक्रार दाखल केली आहे.