CWG2018: पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालला हरवून राहुल आवारे अंतिम फेरीत!

Rahul Aware

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीपटू राहुल आवारेनं अंतिम फेरीत धडक मारत भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं आहे. राहुलनं ५७ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालचा १२-८ नं पराभव करत उपांत्य फेरीचा सामना जिंकला आहे. आता अंतिम फेरीत राहुलला कॅनडाच्या स्टिफन ताकाहशीचा सामना करावा लागेल.

सेमीफायनलमध्ये राहुल आवारेने भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी देश असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालला धोबीपछाड दिला. राहुल आणि मोहम्मदमध्ये अटीतटीची झुंज सुरु होती. यानंतर मोहम्मदनं आघाडी घेण्याच्या प्रयत्नात राहुलला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुलनं मोहम्मदचा डाव त्याच्यावरच उलटवला. राहुलनं प्रथम प्रतिस्पर्ध्याचा प्रयत्न निष्फळ केला. त्यानंतर त्यानं दोनदा मोहम्मदला लोळवलं आणि सहा गुणांची कमाई केली. यामुळे राहुलला १०-४ अशी भक्कम आघाडी मिळाली. यानंतर मोहम्मदनं २ गुण मिळवत पिछाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला.मोठी आघाडी घेतल्यानंतर राहुलनं सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलं. सामना संपण्यास काही सेकंद बाकी असताना राहुलनं आणखी दोन गुणांची कमाई करत आघाडी १२-६ अशी केली. यानंतर मोहम्मदनं २ गुण मिळवले. मात्र तोपर्यंत सामना त्याच्या हातून निसटला होता. राहुलनं मोहम्मद बिलालचा १२-८ असा पराभव अतिशय अटीतटीच्या सामन्यात राहुल आवारेने कडवी झुंज देत 12-8 असा विजय मिळवला. या विजयानंतर फायनलमध्ये धडक देत त्याने भारतासाठी रौप्यपदक निश्चित केलं आहे.

राहुलने याआधी त्याच्या दोन सामन्यात तांत्रिक वर्चस्वाच्या जोरावर उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता. राहुलने पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या जॉर्ज रामवर 4-0 असा विजय मिळवला होता. राहुलच्या तुलनेत जॉर्ज कामगिरी फारच सुमार असल्याने रेफ्रीने राहुल आवारेला विजयी घोषित केलं.पुढच्या सामन्यात राहुल आवारेने ऑस्ट्रेलियाच्या थॉमस चिचिहिनीला मात देऊन उपांत्य सामन्यात प्रवेश केला. दरम्यान, राहुलचा अंतिम सामना आज दुपारी 12 वाजता कॅनडाचा पैलवान स्टीफन तकाहाशीसोबत होणार आहे. त्यामुळे आणखी एक सुवर्ण पदक मिळण्याची भारतीयांची अपेक्षा उंचावली आहे.