समर्थ रामदास स्वामी यांचा चरित्रपट ‘रघुवीर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

samarth ramdas, raguveer

टीम महाराष्ट्र देशा- ‘समर्थ रामदास स्वामी’ यांच्या जीवनावर आधारित रघुवीर हा चरित्रपट लवकरच झळकणार आहे.निर्माते अभिनव पाठक यांची समर्थ क्रिएशन ही संस्था या चित्रपटाची निर्मिती करत असून निलेश कुंजीर हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झालं असून समर्थांची भूमिका कोण साकारत आहे, हे मात्र सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

Abhinav Pathak ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಮೇ 6, 2018

 

रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. ते अद्वैतवेदान्ती होते. त्याच्या तत्त्वज्ञानास संत एकनाथांच्या वाङ्मयाची बैठक होती. दासबोधाच्या बहुतेक सर्व दशकांमध्ये ब्रह्म, माया, जीव, जगत्, परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो असे ते सांगतात. समर्थ रामदास स्वामी स्वतः सदैव विदेही अवस्थेमध्ये असल्याने त्यांचे हे अनुभवज्ञान त्यांनी ग्रंथरूपाने मांडले.

‘शुभ मंगल सावधान’ हा मंत्र उच्चारताच त्या १२ वर्षाच्या मुलाने भर लग्नातून धूम ठोकली. रानोमाळ भटकला. वैराग्य धारण केले आणि त्याला जीवनाचे सार सापडले. हेच जीवनाचे सार आपल्याला ‘दासबोध’ या ग्रंथातून आदर्श जीवन जगण्याचे धडे देतो. हा तरुण म्हणजे महाराष्ट्रातील ‘संत सांप्रदायातील एक संत समर्थ रामदास स्वामी’. रामाचे परमभक्त म्हणून संपूर्ण जग ज्यांना ओळखते ते म्हणदे समर्थ रामदास स्वामी.

रामदास स्वामी म्हटले की आपल्याला मनाचे श्लोक इतकंच आठवतं पण त्याचं कार्य त्याहून अधिक आहे. समर्थ रामदास स्वामींनी तरुणांमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण केली. तरुणांनी बालोपासना करावी यासाठी कुस्तीचे आखाडे गावोगावी उभारले. सूर्यनमस्काराचे महत्त्व आपल्याला आज कळतंय त्याचे बीज समर्थांनी पेरले. मारुती म्हणजे शक्तीची देवता. मारुतीपासून तरुणांनी प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांनी प्रत्येक गावात मारुतीची स्थापना केली, मठ उभारले. महाराष्ट्रात चैतन्य निर्माण केलं. त्यांनी आजन्म ब्रम्हचारी राहण्याची शपथ घेतली त्याप्रमाणे ते आजन्म संन्यस्त राहिले.

या तेजस्वी आणि ओजस्वी संताची आजच्या पिढीला नव्याने ओळख करून देण्यासाठी ‘रघुवीर’ हा सिनेमा लवकरच पडद्यावर येत आहे. अभिराम भडकमकर यांनी चित्रपटाची कथा पटकथा लिहिली आहे. मंदार चोळकर यांची गीते आणि अजित परब यांच्या संगीताने चित्रपट नटला आहे. सिनेसृष्टीतल्या अनेक नामवंत कलाकारांच्या अभिनयाने हा चित्रपट रंगला आहे इतकं निलेश यांनी सांगितलं. ‘रघुवीर’ हा संत समर्थ रामदास स्वामी यांचा चरित्रपट निश्चितच आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.