रघुराम राजन जाणार विश्व हिंदू परिषदेच्या व्यासपीठावर ?

टीम महाराष्ट्र देशा- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मुखर्जी यांच्या निर्णयामुळे  अस्वस्थ असलेल्या पुरोगामी विचारवंतांना आता जोराचा धक्का देणारी आणखी एक बातमी आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर व मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे टीकाकार रघुराम राजन हे विश्व हिंदू परिषदेच्या एका मेळाव्यात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग होता, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता, त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाणार आहेत. संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

येत्या सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील शिकागो इथं विहिंपनं वर्ल्ड हिंदू काँग्रेसचं आयोजन केलं आहे. जगभरातील हिंदू संघटनांच्या नेत्यांसह सरसंघचालक मोहन भागवत, तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही महासभेला उपस्थित राहणार आहेत.

राजन यांनाही या महासभेत सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. महासभेत होणाऱ्या आर्थिक विषयावरील चर्चासत्रात सहभागी होऊन त्यांनी आपले विचार मांडावेत, अशी विनंती आयोजकांनी त्यांना केली आहे. राजन यांनी निमंत्रणास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘मी कार्यक्रमाला येण्याचा पूर्ण प्रयत्न करीन’, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं ते सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय.