fbpx

#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल खरेदीचे तपशील सादर

टीम महाराष्ट्र देशा- राफेल विमानाच्या खरेदी घोटाळ्यावरील वादाने राजकीय वळण घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करतेवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला राफेल खरेदीचे तपशील सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार सोमवारी केंद्र सरकारतर्फे राफेल खरेदीचे तपशील सादर केले आहेत.

‘३६ राफेल विमानांच्या खरेदी प्रक्रियेची विस्तृत माहिती’ असे शीर्षक या कागदपत्रांना देण्यात आले आहे. फ्रान्सकडून ३६ राफेल विमानांची खरेदी करताना संरक्षम सामुग्री खरेदी प्रक्रिया २०१३ चे पालन करण्यात आले होते, अशी माहिती केंद्राने या कागदपत्रांमधून दिली आहे. राफेल विमानांची खरेदी करण्यापूर्वी फ्रान्स सरकारसोबत या करारासंदर्भात सुमारे एक वर्ष चर्चा सुरू होती. अखेरीस सीसीएस (कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडून परवानगी घेतल्यानंतरच या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, असे सरकारने या कागदपत्रांत म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने या खरेदी प्रक्रियेची माहिती देणारी कागदपत्रे याचिकाकर्त्यांना सोपवली. संरक्षण खरेदी प्रक्रिया २०१३ च्या नियमानुसारच राफेल विमानांची खरेदी करण्यात आली आहे असे सरकारने स्पष्ट केले आहे. करार करण्याआधी संरक्षण खरेदी परिषद आणि सुरक्षेसंदर्भातील मंत्रिमंडळ समितीची परवानगी घेण्यात आली होती असा दावा सरकारने केला आहे.