मुख्यमंत्री बोलावतील त्या दिवशी मी तयार – राधाकृष्ण विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत भाष्य केले आहे. आज भाजप प्रवेश हा मुद्दा राहिलेला नाही. ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार आहे. असे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. संगमनेरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. विखे पाटील यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे, त्यामुळे भाजप प्रवेश हा मुद्दा आज राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचं समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरु आहे, असे विखे पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर विखेंची मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चाही सुरु आहे यावरही त्यांनी भाष्य केले. मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी आणि मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे त्यांनी म्हंटले.