लोकशाही व नीतिमत्तेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाचा कर्नाटकात मुखवटा गळून पडला : राधाकृष्ण विखे

vikhe patil

अहमदनगर / प्रशांत झावरे : लोकशाही धाब्यावर बसवून बळकावलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री पद भारतीय जनता पक्षाला अखेर सोडावे लागले असून लोकशाही व नीतिमत्तेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाचा यामुळे मुखवटा गळून पडला असून हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी केलेल्या खटाटोपातून भाजपचा लोकशाही विरोधी चेहरा समोर आला असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन देशभरातील राजकीय चित्र पालटणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

कर्नाटकातील घटनाक्रमावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, कर्नाटकचे विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११६ आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर केली. परंतु राज्यपालांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय न घेता कागदावरसुद्धा बहुमत नसलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेची संधी दिली. भाजपने केवळ १०४ आमदारांची यादी दिली होती. तरीही राज्यपालांनी घेतलेल्या या निर्णयामुळे घोडेबाजाराला चालना मिळून लोकशाहीचे धिंडवडे निघणार होते. परंतु सरतेशेवटी भाजपचा घोडेबाजारही यशस्वी झाला नाही आणि येडीयुरप्पांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर आता तेथील राज्यपालांना एक क्षणभरही पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

लोकशाही अन् नीतीमत्तेच्या गप्पा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा मुखवटा गळून पडला असून संपूर्ण देशाला त्यांची खरी ओळख झाली आहे. मागील दोन – तीन दिवसांत काँग्रेस आमदारांना लालूच देण्यासंदर्भात समोर आलेले फोन रेकॉर्डिंग्स, केंद्रिय यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस आमदारांवर दबाव आणण्याचे झालेले प्रयत्न पाहता या संपूर्ण घटनाक्रमाचे पडसाद पुढील काळात भारताच्या कानाकोपऱ्यात उमटताना दिसतील. असेही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.