fbpx

‘जनतेचे समर्थन मागण्याची हिंमत नाही म्हणूनच भाजपचे ‘सेलिब्रेटीं’शी संपर्काचे अभियान’

मुंबई : केंद्र व राज्य सरकारच्या मागील चार वर्षांच्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. भाजपलाही त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे थेट जनतेशी संपर्क साधून त्यांचे समर्थन मागण्याची हिंमत भाजपकडे राहिलेली नाही. परिणामतः त्यांच्यावर ‘सेलिब्रेटीं’कडे जाऊन ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान राबवण्याची वेळ ओढवली, अशी बोचरी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी दोन्ही पक्षांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, भाजपने समर्थन मागण्यासाठी ‘सेलिब्रिटीं’ऐवजी सर्वसामान्य जनतेकडे जायला हवे होते. गेल्या 1 जूनपासून संपूर्ण देशात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. भाजपला समर्थन मागायचेच होते तर संपकर्त्या शेतकऱ्यांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. पेट्रोल-डिझेलच्या महागाईने होरपळून निघालेल्या ग्राहकांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. एसटीच्या 18 टक्के भाडेवाढीचा फटका बसलेल्या सर्वसामान्य प्रवाशांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. नोकरीसाठी दाहीदिशा फिरणाऱ्या तरूणांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. नोटबंदी, जीएसटीने व्यवसाय ठप्प झालेल्या व्यापारी अन् उद्योजकांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. पण भाजपकडे तेवढी हिंमत राहिलेली नसून, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना भेटून अन् त्यांचे समर्थन मागून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.