fbpx

अहमदनगर: राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली दिलीप गांधींची भेट

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नगरमध्ये दिलीप गांधींचे तिकीट कापून सुजय विखेंना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे गांधी समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत. दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सुजय विखेंचे वडील व विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. त्यांनी जवळपास तासभर चर्चाही केली. त्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधान आलं आहे. भेटीनंतर विखेंनी ‘दिलीप गांधी आणि आमचे घरगुती संबंध आहेत, हे घर माझचं आहे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सुवेंद्र गांधी यांना युवकांचा मोठा पाठींबा असल्याने त्यांची बंडखोरी विखेसाठी डोकेदुखी ठरू शकते. सुवेंद्रची समजूत काढून तो पक्षाचं काम करेल असा विश्वास दिलीप गांधीनी यावेळी व्यक्त केला.

राधाकृष्ण विखेंनी नगरमध्ये कुणाचाही प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु विखेंनी श्रीगोंद्यात समर्थकांच्या भेटी घेतल्या होत्या तर आता दिलीप गांधी यांची देखील भेट घेवून पुत्र सुजय विखेंच्या प्रचाराला सुरुवात केली असंच म्हणावं लागेल.