राधाकृष्ण विखेंनी घेतली भाजप कार्यकर्त्यांची भेट, भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी नगरमधील भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची भेट घेतली. पुत्र सुजय विखेंच्या संपर्क कार्यालयात ही भेट झाली. या भेटीमुळे विखेंनी पुत्र सुजय यांच्या प्रचाराला अधिकृतरीत्या सुरुवात केली आहे.

या भेटीला भाजप व शिवसेनेचे नेते उपस्थित होते. यामध्ये अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांच्यासह स्थानिक भाजपच्या नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रचाराचा आढावा घेतला. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील यावर देखील शिक्कामोर्तब झाले आहे.

नगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नगरमध्ये येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी झालेल्या भेटीमुळे राधाकृष्ण विखे शुक्रवारी होणाऱ्या सभेत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेला बळकटी मिळाली आहे.