साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांत राडा; नगरसेवकासह ५ जणांवर गुन्हा

सातारा : साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास रविवार पेठेत जोरदार सशस्त्र हाणामारी झाला. या प्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सशस्त्र हाणामारीत पाचजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर सातारा शहरात तणावाचे वातावरण होते. जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात युवकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पोलिसांनी जमावाला पांगविल्यानंतर तणाव निवळला.

मिळालेल्या माहितीनूसार, बुधवारी संध्याकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावली आणि त्यातून भडका उडाला. त्यातून दोन्ही गटांच्या तुफान हाणामारीतून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

साताऱ्यात रात्री सव्वा आठच्या आसपास सनी भोसले हा त्याच्या मित्रांसमवेत दुर्गा पेठेत गेला होता. याच ठिकाणी बाळासाहेब खंदारे यांचे कार्यालय आहे. कार्यालयासमोरच गाडी लावल्याने खंदारे आणि भोसले गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. दोन गटांमध्ये उडालेल्या या धुमश्चक्रीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा शहरामध्ये आज गुरुवारी संपूर्ण दिवस बैठकांचे सत्र होणार आहे. विशेष म्हणजे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघे साताऱ्याबाहेर असतानाचा मुहूर्त राजधानीमधील गोपनीय बैठकीसाठी निवडण्यात आला आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक, साताऱ्यासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुका या विषयावर बैठकीमध्ये सल्लामसलत केली जाणार आहे. या बैठकीसाठी प्रमुख नेतेमंडळींना बोलावणे धाडण्यात आले आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते रात्री ९ पर्यंत विभागवार मॅरेथॉन बैठका घेतल्या जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या