महाराष्ट्र दिन : शिवसेना-विदर्भवाद्यांमध्ये हमरीतुमरी

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर आयोजित चर्चासत्रात शिवसैनिक आणि विदर्भवादी कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने एकच गोधळ उडाला. शिवसेनेचे कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत असताना विदर्भवाद्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे वातावरण तापले व हमरीतुमरीपर्यंत वेळ आली. तापलेले वातावरण लक्षात घेता राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्र मॅक्सिमस : द स्टेट, इट्स सोसायटी अ‍ॅन्ड  पॉलिटिक्स’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यात शिवसेना खा. आनंद अडसूळ, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे, माजी खासदार विजय दर्डा, अ‍ॅड. श्रीहरी अणे,‘वनराई’चे विश्वस्त गिरीश गांधी, साहित्यिक वि. स.जोग हे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वेगळ्या विदर्भाची चर्चा कल्पनाविलास आहे का, या मुद्यावर अ‍ॅड.अणे यांचे मत विचारण्यात आले. अ‍ॅड. अणे यांनी याचे उत्तर तर येथे उपस्थित विदर्भवादीच आपले हात वर करून देतील, असे म्हटले.यावर सभागृहात उपस्थित शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.