डान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं ?

टीम महाराष्ट्र देशा : ‘डान्सबारवरची बंदी उठवली हा निर्णय आमच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी म्हणावा लागेल. आज एक काळा दिवस आहे. असे म्हणत आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे. आर आर पाटील यांनी डान्सबार बंद केले होते. गृहखातं त्यांच्याकडे होतं. अनेक केसेस आबांसमोर येत होत्या. त्यामुळे डान्सबार बंदी करण्यात आली होती, असंही त्या एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबारची छम-छम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील डान्स बारबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे अनेक नियम आणि अटी शिथिल केल्या. डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. तर बार आणि डान्सिंग एरिया वेगवेगळे ठेवण्याची अटही शिथिल करण्यात आली. राज्य सरकारने उगारलेल्या छडीची नको, तर घुंगरांची छमछम व्हावी, यासाठी डान्सबार चालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

पुढे बोलताना स्मिता पाटील म्हणाल्या, मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की त्यांनी जो कायदा केला, तो आणखी मजबूत करावा. आबा असताना अशा गोष्टी समोर आल्यानंतर कायदा आणखी कडक केला जायचा. मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं तर डान्सबार नक्कीच बंद होतील. आजचा निर्णय म्हणजे सरकारच्या कर्माची फळं आहेत. चांगला वकील दिला नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने अटी रद्द केल्या, असंही त्यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या.

या प्रकरणी सुप्रीम कोर्टात अंतिम निकाल देण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या नव्या कायद्याविरोधात डान्सबार चालकांनी केलेल्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. महाराष्ट्र सरकारने कायदे इतके कडक केले आहेत, की आम्हाला डान्स बारचा परवानाच मिळू दिला नाही, असा आरोप डान्स बार चालकांनी केला होता. या कायद्यामुळे महिलांचं शोषण आणि इतर गैरप्रकार रोखले जात आहेत, असा दावा सरकारने केला होता. सुप्रीम कोर्टाने डान्सबारला हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य सरकारने काही ‘संस्कारी’ अटी आणि शर्थी घातल्या होत्या.