उद्धव ठाकरे म्हणतात मतभेद दूर झाले, मग बंगालमध्ये सेना वेगळी का लढतेय ?

टीम महाराष्ट्र देशा : आमच्यात मतभेद होते पण आता आमचं मन जुळलं आहे, असं सांगत भाजपाध्यक्ष अमित शाह यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन गांधीनगरमधील मतदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्याआधी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी एन. डी. ए. पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास देखील व्यक्त केला.

दरम्यान, ठाकरे यांनी आमच्यातील मतभेद दूर झाले असल्याचे जरी सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र काही वेगळचं चित्र पहायला मिळत आहे. राज्यातील ४८ जागांवर शिवसेना भाजपने युती केली असली तरी, बंगालमधील १५ जागांवर शिवसेना स्वबळावर लढणार आहे. फक्त बंगालच नव्हे तर, असचं काहीसं चित्र गोव्यात देखील पहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात ज्या मुद्यांवरून युती झाली तो मुद्दा बंगालमध्ये लक्षात का घेण्यात आला नाही. असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. तसेच सेना भाजप महाराष्ट्रात वेगळे लढले तर हिंदुत्ववादी मतांची विभागणी होईल अशी भीती सेनेने व्यक्त केली होती. मग आता भाजप विरोधात बंगाल मध्ये लढताना हिंदुत्वादी मतांची विभागणी होणार नाही का ? असा सवाल सोशल मिडीयावर उपस्थित होऊ लागला आहे.