मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. तसेच महाराष्ट्र स्थापनेस ६२ वर्षे झाली तरी ‘मुंबई कुणाची?’ हा प्रश्न कायम चर्चेत असतो. कारण देशाचे हे प्रमुख आर्थिक, औद्योगिक केंद्र महाराष्ट्रापासून वेगळे करावे यासाठी अमराठी धनिकांची अखंड धडपड आजही सुरूच आहे. जे अखंड हिंदुस्थानचे फक्त स्वप्नच दाखवतात तेच लोक महाराष्ट्राचे शत्रू बनले आहेत, असेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘महाराष्ट्राची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने चालली आहे? महाराष्ट्र अस्तित्वात येऊन ६२ वर्षे झाली व राज्याच्या निर्मितीचे उत्सव नित्यनेमाने साजरे होत आहेत. पण महाराष्ट्र आज कधी नव्हे इतका अशांत आणि अस्थिर झाला आहे. आदर्शाची हेटाळणी हा सध्याच्या महाराष्ट्रातील एक नवा चाळा होऊ पाहतो आहे. हे आता रोजच घडत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्र सरकार साजरा करीत आहे. त्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महाराष्ट्र अग्रस्थानी होता याचा विसर सध्याच्या केंद्रीय नेतृत्वास पडला आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज, अटक-पंधारपर्यंत तलवार चालविणारे पेशवे, औरंगजेबाला महाराष्ट्रातच गाडणारे मराठे, तात्या टोपे, झाशीची राणी, क्रांतिवीर फडके, लोकमान्य टिळक नसते तर स्वातंत्र्यलढय़ाची ठिणगी भडकली असती काय? महाराष्ट्राने आदर्श निर्माण केले, त्या आदर्शाची हेटाळणी करणारे लोक याच राज्यात निर्माण झाले. समाजाच्या अनेकांगी विकासाची लहान-मोठी स्वप्ने डोळ्यांपुढे ठेवून त्या स्वप्नांना सत्यात आणण्यासाठी आपले आयुष्य त्या कार्यात झोकून देणारी माणसे महाराष्ट्रात चोहोबाजूंनी दिसत होती. आदर्श, ध्येय या शब्दांवर महाराष्ट्रीय समाजाचा विश्वास होता. कारण त्या शब्दांमागे असंख्य ध्येयवीर लोकांची फौज महाराष्ट्राने निर्माण केली.’
महत्वाच्या बातम्या:
- …सत्तेसाठी पवारसाहेबांनी कधीच चुकीची तडजोड केली नाही”; अजित पवारांचा खुलासा
- राणा दाम्पत्यांच्या जामिनावर सुनावणी पूर्ण, निकाल सोमवारी जाहीर होणार!
- IPL 2022 : मोठी बातमी..! महेंद्रसिंह धोनी पुन्हा बनला CSKचा कर्णधार; वाचा सविस्तर!
- IPL 2022 RR vs MI : राजस्थानचं मुंबई इंडियन्सला १५९ धावांचं आव्हान; बटलरचं अर्धशतक!
- IPL 2022 RR vs MI : हुश्श..जिंकलो! रोहितला मिळालं बर्थडे गिफ्ट; मुंबई इंडियन्सचा पहिला विजय!