‘प्रा. राजन शिंदे खून प्रकरण’ गुंता वाढला; तीन दिवस उलटूनही मारेकरी मोकाट

rajan shinde murder

औरंगाबाद : मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांच्या संशयास्पद हत्येमुळे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्यासह अख्खे पोलीस दल चक्रावून गेले आहे. राजन यांच्या क्रूर हत्येला तीन दिवस उलटले तरीही पोलीस सबळ पुराव्यांअभावी आरोपी पर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेले नाही. शिंदे यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांना मारून घराच्या आसपास कपडे फेकले असावेत. या शोधासाठी बुधवारी पोलिसांनी मोहीम हाती घेतली. मात्र विहिरीमध्ये दीड तासाच्या शोधानंतर देखील काहीही हाती लागलेले नाही. अजूनही शिंदे यांचा खूनाचे गुपित कायम आहे.

बुधवारी शिंदे यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत अग्निशमन दलाच्या जवानांना उतरवण्यात आले. मात्र हा शोध घेतल्यानंतर देखील जवानांच्या हाती काही लागले नाही. मात्र कचऱ्याने तुंबलेल्या विहिरीत विषारी वायू असल्याचे जाणवल्याने जास्त खोलवर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांनी माघार घेतली. आता पर्यंत जवळपास जाता येईल असा कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. संपूर्ण गुन्हे शाखेसह पोलीस आयुक्त यांनी स्थापन केलेले विशेष तपास पथक इतर विविध ठाण्यातील महिला अधिकारी या प्रकरणी तपास करत आहेत.

बुधवारी सकाळी नऊ वाजेपासून निकटवर्तीयांच्या व्यतिरिक्त शिंदे यांचा मित्रपरिवार इतर नातेवाईक अशा सुमारे ४० ते ४५ जणांना विश्वासात घेऊन धीर देत विचारपूस केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. दरम्यान डॉ. राजन शिंदे यांच्या पत्नी प्रा. डॉ. मनीषा यांनी मुलगी चैतालीला सोबत घेऊन मंगळवारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रातून औरंगाबाद येथील विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात बदली करावी, अशी तोंडी मागणी त्यांनी केली. दीड वर्षापूर्वी लेखी निवेदन दिल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार केला जाईल. असे त्यांना सांगितल्याचे कुलगुरू म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या