स्मार्ट सिटीच्या यादीत पालिकेचे नाव वरच्या क्रमांकावर आणा नाहीतर निलंबित करू – महापौर

डोंबिवली  : स्मार्ट सिटीच्या यादीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नाव २१४ क्रमांकावर गेल्याने आपल्या पालिकेचे नाव १०० क्रमांकाच्या आत येण्यासाठी आता महापौरांनी वेगळी कल्पना लढवली आहे. स्मार्ट सिटीच्या यादीत पालिकेचे नाव वरच्या क्रमांकावर आणा नाहीतर निलंबित करू अशी तंबी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पालिका घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांना दिली. एकीकडे आयुक्त कौतुक करतात मात्र महापौरांच्या अशा फर्मानामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहेत.

नुकतेच कल्याण येथील पालिकेच्या मुख्यालयात महापौरांची अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापौर देवळेकर यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. स्वच्छता अॅप नागरिकांकडून डाऊनलोड करण्याचे २३ हजाराचे टार्गेट पूर्ण करण्यास अधिकारी आणि कर्मचा-यांना जुंपण्यात आले होते. मात्र त्याचा परिमाण पालिकेच्या इतर कामकाजावर झाला होता. महापौरांकडून कौतुक मिळले अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना होती. परंतु कौतुक न होता तंबी मिळाल्याने अधिकारी वर्ग नाराज झाले. स्मार्ट सिटीत घनकचरा व्यवस्थापन महत्वाचे असून त्यासाठी या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.

मात्र स्मार्ट सिटीच्या यादीत पालिकेचे नाव यादीत वरच्या क्रमांकावर येण्यासाठी महापौरांनी याप्रकारे धाक-दडपशाहीने फर्मान काढणे बरोबर नाही अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. जरी महापौर देवळेकर याबाबतचा ठराव महासभेत मांडणार असले तरी यावर पालिका आयुक्त पी. वेलुरासू काय निर्णय घेतात याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्य म्हणजे पालिका आयुक्तांनी पालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता अॅप बाबत कौतुक करून सर्वांना शुभेच्छा मेसेज केले होते. मात्र आता महापौरांच्या वक्तव्यामुळे आयुक्त कोणती भूमिका घेतात अशी विचारणा होत आहे.

Loading...