‘चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांचे लोककल्याणकारी कार्य पुढे यावे’ पुरुषोत्तम खेडेकर यांचे रितेश देशमुखला पत्र

मुंबई –  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अभिनेता रितेश देशमुख चित्रपट बनवत असून या चित्रपटाच्या निमित्ताने मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी रितेश देशमुखला पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांचे लोककल्याणकारी कार्य पुढे यावे, अशी विनंती पुरुषोत्तम खेडेकर यांनी रितेश देशमुखला केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याबद्दल खेडेकरांनी रितेशला काही सूचना केल्या आहेत तसेच काही शिवचरित्रकार वा अभ्यासक यांच्याशी संवाद साधण्याची देखील विनंती करण्यात आली आहे. ज्यात  न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील,डॉ.जयसिंगराव पवार,डॉ.आ.ह.साळुंखे , आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड,डॉ.पी.ए. इनामदार आदी मंडळींच्या नावाचा समावेश आहे

 

पुरुषोत्तम खेडेकर यांचं अभिनेता रितेश देशमुख याला पत्र 

प्रति, मा.शिवश्री रितेशजी देशमुख

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता

विषय – छत्रपती शिवाजी महाराज चित्रपटाबाबत विनंती

महोदय, अभिनंदन व आभारसह जय जिजाऊ. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर उत्तम चित्रपटाचे निर्माण करत असल्याचे वाचण्यात आले. अभिनंदन.

महोदय, छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक व्यक्तित्व होते. त्यांना आई-वडिलांनी वयाच्या बाराव्या वर्षी विश्वावंदनिय ठरावी अशी राजमुद्रा दिली. महाराज अल्पायुष्यात आपल्या लोककल्याणकारी कर्तृत्व व कार्य यांच्या जोरावर खरोखरच विश्वावंदनिय ठरले.

स्वराज्य निर्मितीसाठीच त्यांनी नाईलाज झाल्यावरच हाती शस्त्र धरले. या अपरिहार्य संघर्षातूनच त्यांना लोकमने जिंकता आली. लोक विकास साधता आला. थोडक्यात त्यांच्यावर लादलेला लढायांचा संघर्ष हा साधन होता. साध्य नव्हता. लोककल्याण हेच स्वराज्याचे एकमेव साध्य होते.

महोदय, अफजलखान कोथळा, शाहिस्तेखान बोटे, दिलेरखान लढा, पन्हाळगड वेढा, औरंगजेब नजरकैद, करतलबखान जरब, रिव्हींग्टन बदला, सुरतची बदसुरत इत्यादि ऐतिहासिक घटना सत्य आहेत. परंतू इतिहासकार, कादंबरीकार, शाहीर, लेखक, नाटककार, कथाकार, चित्रपट-सिरियल निर्माते इत्यादींनी हे इतिहासातील प्रसंग अतिरंजित व द्वेषमुलक रेखाटले आहेत. परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी कार्य जनतेपर्यंत पोचलेच नाही.

जगाला विश्वाबंधुत्वातून जोडणारे शिवचरित्र व छत्रपती शिवाजी महाराज भारतीयांनाच तोडणारे व आपसात द्वेषभावना निर्माण करण्यासाठी काही जणाकडून वापरण्यात आले. सच्चे शिवप्रेमी महाराजांच्या नावाला भुलले आणि दुर्दैवाने भावनिकतेने अनेक गैरकार्यात सहभागी झाले. हा प्रकार आता कमी होत आहे.

महोदय, ५ जानेवारी २००४ रोजी संभाजी ब्रिगेडने जेम्स लेन या अमेरिकन लेखकाच्या विरोधात भांडारकर संस्थेविरोधात कारवाई केली होती. त्यानंतर भारतीय इतिहासकारांची इतिहासाकडे पाहण्याची नजरही बदलली. यातून शिवरायांचा व मराठ्यांचा बराचसा सत्य इतिहास जनतेसमोर येऊ शकला.

याच दरम्यान मा.नितीन देसाईंनी शिवरायांवर एक सिरियल काढली. इत्तःपर प्रत्येक निर्माता, दिग्दर्शक, कथा-पटकथा लेखक वाद निर्माण होतील या भितीने ग्रस्त असे. यामुळेच कदाचित कुणी पुढे आले नाही. महाराष्ट्र शासनाकडेही आम्ही आग्रह धरला होता. पण जमले नाही.

महोदय, या व अशाच विविध वादांच्या पृष्ठभूमीवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीचा घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे.

आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया चित्रपटाच्या माध्यमातून केवळ लढाया, हाणामाऱ्या, बंदुका-तलवारी-तोफांचे वापर, रक्तपात, रंग व झेंड्यांचे युद्ध, निखळ मनोरंजन, अतिरंजीत वा भडक दृश्ये इत्यादि प्रकार येऊ नयेत. कला या अंगाने काही ऐतिहासिक घटनांना मूळ संदेश वा परिणाम न बदलता काही मुलामा देणे समजू शकते. प्रामुख्याने या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रचंड मोठे लोककल्याणकारी काम जगासमोर यावे हीच विनंती.

काही नामांकित सच्चे शिवचरित्रकार वा अभ्यासक आहेत. जमल्यास त्यांच्याशी संवाद साधावा. ही विनंती.

काही नावे अशी –

१) न्या.बी.जी.कोळसे पाटील – 9822434343, 9422009434

२) डॉ.जयसिंगराव पवार – 9921112101

३) इंद्रजित सावंत – 9890073877

४) डॉ.आ.ह.साळुंखे – 9420627211

५) ज्ञानेश महाराव – 9322222145

६) आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड – 9820055300

७) डॉ.पी.ए. इनामदार – 9822022171

८) किशोर ढमाले – 9422015854

९) चंद्रशेखर शिखरे – 7030370303.

या शिवाय छत्रपती उदयन राजे व छत्रपती संभाजी राजे यांनाही विश्वासात घेणे सोयीचेच राहिल.

महोदय, आपल्या चित्रपटातून एक हजार टक्के केवळ सकारात्मक संदेशच जगात पोचावा, हीच विनंती.

छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदूधर्मरक्षक, हिंदूधर्माभिमानी, भारतीय वा मराठ्यांची अस्मिता, मराठी, मराठा इत्यादि विशेषणांनी ओळखणे हा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा खुजी करण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्व पशुपक्षीमानवांचे कल्याणकर्ते होते. त्या अर्थाने शिवराय, ‛मानव प्रती पालक’ होते वा फारतर, ‛गो-मानव प्रती पालक’ होते. असे म्हणता येईल.

कृपया विचार व्हावा हीच विनंती. तसेच आगाऊ कळवल्यास व सोयीचे असल्यास/वाटल्यास आम्हीही आपण वेळ दिल्यास मुंबई अथवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष भेट व चर्चेसाठी येऊ शकतो.

सोयीनुसार उत्तराची अपेक्षा आहे.

धन्यवाद व सदिच्छा !!

आपला शिवांकित पुरुषोत्तम खेडेकर

 

You might also like
Comments
Loading...