पुरंदर विमानतळाला रिंगरोडची कनेक्‍टिव्हीटी

पुणे  : पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नुकतीच संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. विमानतळावर जाण्यासाठी रोडची कनेक्‍टिव्हीटी देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील रिंगरोड हा आंबेगाव खुर्द-उरुळी-वडाची वाडी-वाघोली हा मार्ग विमानतळाच्या काही किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाने पुरंदर विमानतळाकडे जाण्यासाठीचा 18 किमी लांबीचा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमानतळाकडे जाण्यासाठीचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

पुरंदर विमानतळ उभारण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. विमानतळ उभारण्याबरोबरच त्यासाठीच्या पायाभूत सुविधा असणे आवश्‍यक आहे. पुरंदर विमानतळावर हे पश्‍चिम महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरणार आहे. सातारा महामार्ग, सोलापूर महामार्गावरून पुरंदर विमानतळावर येण्यासाठी रोडची कनेक्‍टिव्हीटी असणे आवश्‍यक आहे.याविषयी माहिती देताना प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते म्हणाले, रिंगरोडवरून विमानतळाला जाण्यासाठी करण्यात येणाऱ्या रस्त्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पारगावसह सात गावांमध्ये विमानतळ प्रस्तावित आहे.

या ठिकाणी जाण्याकरिता दिवेघाट, शिंदवणी घाट (उरळी कांचन), बोपदेव घाट असे तीन रस्ते आहेत. या रस्त्यांवरून विमानतळावर लवकरच पोहोचण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. रिंगरोडवरून पारगावपर्यंत अठरा किलोमीटरचा रस्ता करण्यात येणार आहे. पुरंदर विमानतळ हे प्राधिकरणाच्या हद्दीत असल्याने या विमानतळाला रस्त्यांची कनेक्‍टिव्हीटी देणे हे प्राधिकरणाचे कर्तव्य असल्याचे गित्ते यांनी सांगितले.पीएमआरडीएकडील मोकळ्या जागांपैकी वाघोलीमधील दोन जागा पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.

या दोन्ही जागा वाघोलीमधील असून बारा हजार चौरस फूट आणि दोन हजार चौरस फूट अशा एकूण चौदा हजार चौरस फुटांच्या या जागा आहेत. या जागा 80 वर्षांच्या भाडेकरारावर सोळा कोटी रुपयांना देण्यात आल्या आहेत. शहर व ग्रामीण भागाच्या हद्दीपर्यंत धावणाऱ्या रात्रीच्या उशीराच्या बसगाड्यांना परतीचा प्रवास करताना थांबण्यासाठी कोठेही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे संबंधीत भागातील फेऱ्या करणाऱ्या बस गाड्यांसाठी रात्री गाड्या उभ्या करण्यासाठी या जागांचा वापर पीएमपीकडून करण्यात येणार आहे. या जागांव्यतिरिक्त आणखी जागांची मागणी पीएमपीकडून पीएमआरडीएकडे करण्यात आली असल्याचे प्राधिकरणाचे आयुक्त गित्ते यांनी सांगितले.