शरद पवार अध्यक्ष असलेल्या ‘रयत’मध्ये पुरस्कार वापसीमुळे खळबळ

पुणे (दीपक पाठक) – महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्था शताब्दी वर्ष साजरे करत आहे.देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार हे सध्या या संस्थेचे अध्यक्ष आहेत. शताब्दी वर्ष साजरे करत असताना विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे तसेच गलथान कारभारामुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकासानाकडे संस्था साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. रयतच्या औंधमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून आता थेट पुरस्कार वापसी सुरु केल्याने खळबळ उडाली आहे.

औंधमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या विविध मागण्यासाठी महाविद्यालयात आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये उपप्राचार्यांना मारहाण करणा-यावर कडक कारवाई करावी ,सुरक्षा रक्षक बदलणे,सुरक्षा कडक करणे,संशयास्पद अतिरिक्त शुल्क ,कमवा आणि शिका योजनेतील अनियमितता व भ्रष्टाचार,शॉर्ट टर्म कोर्स मधील भ्रष्टाचार,क्रिडा विभागाची अनियमीतता ,विद्यार्थी प्रतिनिधिची निवड करावी,कर्मचारी वर्गाकडून अपमानास्पद दिली जात असलेली वागणूक याविरोधात विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला आहे. विशेष म्हणजे शरद पवार हे देशभर फिरून देशामध्ये कसं असहिष्णुतेचे वातावरण आहे हे सांगत फिरत असतात मात्र या महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास मुभा नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

महाविद्यालयातील प्रशासनाकडे अर्ज ,विनंत्या,निवेदनामार्फत तक्रारीचे निवारण करावे यासाठी वेळोवेळी मागण्या केल्या होत्या परंतु प्रशासनाने लेखी देऊन सुद्धा याकडे साफ दुर्लक्ष केले.महाविद्यालय प्रशासनाचा विरोध केला असता प्रशासनाने विद्यार्थ्यांना पोलीसांच्या स्वाधीन केले. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेले पुरस्कार स्वेच्छेने रयत शिक्षण संस्थेला पोस्टामार्फत परत करून विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला आहे..पुरस्कार परत करणारे विद्यार्थ्यांमध्ये रविराज काळे,सुर्यकांत सरवदे,ऋषिकेश कानवाटे,सागर आढाव यांचा समावेश असून यापुढे हे आंदोलन तीव्र करूअसा इशाराही देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या समस्या पुढीलप्रमाणे :-
१)सुरक्षा रक्षकाबाबत :- सुरक्षा रक्षकाबाबत आम्ही वारंवार तक्रार करून तो बदलण्यात आला नाही.त्याच्याकडून गाडी धुवून घेणे व कचरा साफ करण्यासारखी कामे सुरक्षा रक्षकाकडून करून घेतली जातात.जर अशी कामे करून घेतली जात असतील तर आम्ही सुरक्षा रक्षक म्हणून कोणाकडे बघावे.

२) कमवा व शिका:- कमवा व शिका या योजनेमधील मुलांना आपल्या महाविद्यालयात जी कामे दिली जातात व जी वागणूक दिली जाते ती अपमानास्पद आहे .त्या मुलांचे कामाचे तास कमी करून त्या मुलांवर अन्याय केल्याची भावना निर्माण झाल्यामुळे काही ‘मुलांनी कमवा व शिका’ योजनेमधून आपले नाव कमी केले आहे .याबाबत तक्रार केली असता .उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली .मुलांनी काम सोडण्याची कारणे न तपासता हुकूमशहा पध्दतीने त्यांना कमी करण्यात आले .यामध्ये कोणतीही पारदर्शकता नसल्यामुळे या योजनेत भ्रष्टाचार झाला असावा असा प्राथमिक अंदाज वाटत आहे.

३) अतिरिक्त शुल्क:- महाविद्यालयामधील अतिरिक्त शुल्कचा मुद्दा जेव्हा वर आला त्यावेळेस Other fee या कॉलम अंतर्गत शुल्क घेण्याचे कारणच कळत नाही .म्हणून येथे शंका उपस्थित होते.प्रशासन आमच्याकडून कोणत्या कारणासाठी अतिरिक्त शुल्क घेत आहे हे कळत नाही.याबाबत आपणच खुलासा करावा.

४) शॉर्ट टर्म कोर्स :- आपल्या महाविद्यालयात घेण्यात येणारे शॉर्ट टर्म कोर्स बाबत् कोणतेही वेळापञक नाही. शॉर्ट टर्म कोर्स कधी घेण्यात येतात ,कधी नाही याची कल्पना विद्यार्थ्याना नसते .जरी कोर्स घेण्यात आले तरी त्याची कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जात नाही आणि या कोर्स बाबतचे कोणतेही किंवा कसल्याही प्रकारचे प्रमाणपञ देण्यात येत नाही.ही विद्यार्थ्यांची फसवणूक आहे.याबाबत् आम्ही प्रशासनाचा विरोध केला असता प्रशासनाने विद्यार्थ्यांवर गुन्हें दाखल करण्याचा धमकीवजा इशारा देण्यात आला तरी या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावे.

५) जिमखाना विभाग :- जिमखाना या विभागामार्फत कसल्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले जात नाही .कोणत्याही खेळाडूस बाहेरील स्पर्धेसाठी प्रोत्साहित केले जात नाही व अंतर्गत महाविद्यालयीन खेळामध्ये ,खेळाची कोणतीही ओळख नसताना किंवा कोणतेही प्रशिक्षण नसताना वार्षिक कार्यक्रमासाठी अचानक खेळवले जाते.यामुळे मुलांच्या मनामधील खेळासाठीची भावना कमी होताना जाणवते. जिमखाना विभागामधील व्यायामाचे साहीत्य व खेळाचे साहीत्य जुने झाले असून त्यात कोनताही बदल झाला नाही .हा विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळल्याचा प्रकार आहे .

६) महाविद्यालयातील कर्मचारीवर्ग:- कर्मचारी वर्गाकडून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.आणि विद्यार्थ्यांना येणा-या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी कर्मचारी कोणताही पुढाकार घेताना दिसत नाहीत.जबाबदारी एकाकडून – दुस-याकडे,दुस-याकडून – तिस-याकडे ढकलताना आम्हाला पाहण्यास मिळतात.विद्यार्थ्यांची मागणी अशी होती की चौकशी खिडकीची व्यवस्था करावी.

७)सांस्कृतिक विभाग- सांस्कृतिक विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .परंतु या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जात नाही.महापुरुषांच्या प्रतिमा व जयंती साजरी करण्यास महाविद्यालय प्रशासन परवानगी देत नाही व आपल्या महाविद्यालयात स्थापनेपासून महापुरुषांची प्रतिमा प्रथमदर्शनी दिसून येत नाही .ज्या महापुरुषांच्या नावाने आपले महाविद्यालय चालवले जाते .त्याच महापुरुषांची प्रतिमा किंवा प्रशासकीय कागदपञांवर लावण्यास प्रशासन विरोध करत आहे.ही बाब कोणत्याही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासारखी नव्हती याची नोंद घेण्यात यावी.

८) या सर्व प्रकरणाबाबत विद्यार्थ्यांमधून एकजूटीने प्रशासनाचा विरोध केला असता त्यांच्यावर रितसर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशा आशयाचे पञ चतु:शुंगी पोलीस स्टेशनला देण्यात आले .जर महाविद्यालयामध्ये उपप्राचार्याना मारहाण होत असेल ,विद्यार्थी दहशतीच्या वातावरणाखाली वावरत असतील तर आम्ही कोणाकडे पहावे .मुलांच्या वैयक्तिक आयुष्यावर जाऊन टिका करणे,मानसिक खच्चिकरण करणे यामुळे विद्यार्थी संभ्रम अवस्थेत आहेत .मुला-मुलींनी एकञ फिरणे,एकञ बसने यावरसुद्धा खुप मोठ्या प्रमाणावर निर्बंध आणन्यात आले आहेत .हे आमच्या अभिव्यक्ति स्वातंञ्यावर करण्यात आलेला हल्लाच समजतो.

९) या प्रकरणाचे सर्व मुळ महाविद्यालय प्रशासनामधील जबाबदार व्यक्ती म्हणजे प्राचार्य,उपप्राचार्य आहेत.जर त्यांनी ठरवल असत तर आमच्या मागण्या कधीच पुर्ण झाल्या असत्या परंतु गेली पाच वर्षे यांनी महाविद्यालयावर एकप्रकारे हुकूमशाही निर्माण केली आहे ,त्यामुळे त्यांचा कोणीही विरोध करत नाही.

महाविद्यालयामध्ये येणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असतानासुद्धा होणा-या शैक्षणिक नुकसानाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.कर्मवीर आण्णांनी सुरू केलेल्या या मोहीमेचा बळी घेताना प्रशासन दिसत आहे .बहुजनांच्या घरी शिक्षणाची गंगा पोहचावी यासाठी कर्मवीर अण्णांनी खुप कष्ट सहन केले ,हाल अपेष्टा सहन केल्या .या सर्वांचा विसर या प्रशासनाला पडला की काय असा प्रश्न पडतो .जरी प्रकरणाच्या संदर्भात कारवाई करण्याचे पुर्ण अधिकार प्राचार्यांना होते पण त्यांनी तसे केले नाही .जर असंवेदनशील व्यक्ती प्राचार्य पदावर कार्यरत असेल तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाकडे कोण पाहणार हे विद्यार्थी गरीब कुटुंबातुन शिक्षण घेण्यासाठी येत असतात .शिकवला जाणारा शैक्षणिक दर्जा कसा पडताळणार आपण दोन हजार विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय प्रशासनावर लक्ष द्यावे व प्राचार्यांचा राजीनामा किंवा बदली करण्यात यावी असं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांच्या या मागण्या गांभीर्याने घ्याव्या. ही फक्त एक सुरवात आहे .जर प्राचार्यांची बदली किंवा राजीनामा जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यत असेच पुरस्कार परत करण्याचे प्रकार घडत राहतील असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. आज या महाविद्यालयातून पुरस्कार परत करण्याचा प्रकार घडत आहे .असा प्रकार प्रत्येक महाविद्यालयात घडताना दिसेल .या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण कारवाई करावी अन्यथा विद्यार्थ्याकडून या प्रश्नांबाबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल .आम्हाला संस्थेबद्दल आपुलकी,आदर व प्रेम आहे.कर्मवीर अण्णांच्या विचारांनी व फुले,शाहू,आंबेडकर विचारांना माणनारा आपला विद्यार्थी वर्ग असून आपल्या संस्थेचे नाव बदनाम करण्याचा कोणताही वैयक्तीक हेतू नाही असं देखील या विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.

आम्ही यासंदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्या मंजूश्री बोबडे  यांच्याशी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या आम्ही गांभीर्याने घेतल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.या सर्व मागण्या आम्ही जूनपर्यंत पूर्ण करू तसेच याबाबत आम्ही विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन दिल्याचा दावा देखील त्यांनी केला.