fbpx

पुण्यातील माथेफिरू एस.टी.चालक संतोष मानेची फाशी रद्द

पुणे : स्वारगेट डेपोची एक बस पळवून नेत तिच्याखाली नऊ निष्पाप नागरिकांचा चिरडून बळी घेणाऱ्या एस.टी.चालक संतोष मानेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कमी केली आहे. फाशीची शिक्षा रद्द करून संतोष मानेला सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे मानेला दिलासा मिळाला आहे.

हि घटना २०१२ साली घडली होती. त्यानंतर या घटनेचा खटला शिवाजी नगर कोर्टात चालू होता. एक वर्षभर हा खटला चालल्यानंतर 8 एप्रिल 2013 रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ आणि अतिहिंसक घटना असल्याचं कोर्टानं नमूद केलं होते. संतोष मानेला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, असे आदेश देऊन हायकोर्टाने त्याची फाशीची शिक्षा रद्द केली होती.

संतोष मारुती माने हा मुळचा उत्तर सोलापूर तालुक्यातील कवथळे गावचा आहे. स्वारगेट डेपोची एक बस पळवून नेत भर रस्त्यात बेफाम बस चालवून त्यानं 9 जणांना चिरडलं होतं, तर 37 जण जखमी झाले होते.

त्यानंतर उच्च न्यायालयानेही तेच मत नोंदविले होते आणि नऊ खुनांबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयला मानेने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. आज त्यावर सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करून संतोष मानेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.