सीमेवरील सैनिकांसाठी पुणेकरांनी पाठवला तिळगुळ

पुणे  : स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता देशाच्या सीमेचे प्राण पणाला लावून रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकर संक्रांतीनिमित्त पुण्यातून पहिल्या टप्प्यातील सुमारे १०० किलो तिळगूळ देशाच्या सीमेवर सैनिकांना पाठविण्यात आला आहे.

भारत माता की जय, अशा घोषणा देऊन सैनिकांप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करत तिळगूळाचे पूजन करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सुरु असलेल्या या उपक्रमात २५ मंडळांनी सहभाग घेत हा आपुलकीचा ठेवा सैनिकांपर्यंत पोहोचवून देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीवच करुन दिली. शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन पुणे, संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नेने घाट गणेशोत्सव मंडळ, कडबे आळी गणेशोत्सव मंडळ, हसबनिस बखळ मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, त्वष्टा कासार मंडळ आणि इतर सार्वजनिक मंडळांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. अ‍ॅड. गायत्री खडके म्हणाल्या, सध्या जातीपातींवरून समाजात जे वाद होताना दिसत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

आपल्या देशासाठी लढणा-या सैनिकांनी कधीही जातपात मानली नाही. परंतु त्यांना जेव्हा कळेल की आपल्या देशात जातींवरून भांडणे होत आहेत तेव्हा त्यांना खूप वाईट वाटेल. अ‍ॅड. बिपीन पाटोळे म्हणाले, आपल्यामधे सैनिकांप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अतिशय महत्वाचे आहेत. . शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, आपण सैनिकांना तिळगूळ पाठवतो त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला असणा-या लोकांना देखील तिळगूळ घ्या गोड बोला असे सांगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

You might also like
Comments
Loading...