पुणे शहरातील नालेसफाई निकृष्ट दर्जाची

पुणे: गेल्या चार दिवसांपासून पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक ठिकाणच्या रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरुप आले आहे. अनेक चेंबरमधूनही सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने वाहनचालक, पादचार्‍यांची तारांबळ उडताना दिसते आहे.  पावसाळीपूर्व नालेसफाई, सांडपाणी वाहिन्या आणि गटारांची स्वच्छता केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र, ही कामे अद्याप अपूर्णच असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

आता पुणे महापालिकेकडून शहरात करण्यात आलेली नालेसफाई निकृष्ट दर्जाची करण्यात आली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला आहे. या निकृष्ट कामामुळे महापालिकेचे पैसे पाण्यात गेले असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी तसेच या कामाची फेरनिविदा काढण्यात मागणी त्यांनी आयुक्त कुणालकुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

यंदा शहरातील नाल्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी ९८कोटी रुपयांची निविदा पटेल आणि एम बी पाटील या दोन ठेकेदारांना देण्यात आली. याबाबत राष्ट्रवादीने पूर्वीच हरकत घेतली होती. मात्र तरीही त्यावर प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असे या पत्रात म्हटले आहे. ही नालेसफाई निकृष्ट दर्जाची केल्याने या दोन ठेकेदारांना कोणतेही बिल अदा केले जाऊ नये असेही स्पष्ट आले आहे.