आगीने संसार उघड्यावर आलेल्यांच्या मदतीला धावले रोहित पवार

पुणे: मागील आठवड्यात मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकरनगर वसाहतीत भीषण आग लागली होती, या आगीने अनेकांचे संसार उघड्यावर आणले आहेत. जवळपास 75 च्यावर घरांची राख झाली. कोणाची आयुष्यभराची कमाई जळाली तर कोणाचे लेकीच्या लग्नासाठी पैपै करून जमवलेले कपडे- दागिने. याच उघड्यावर आलेल्या लोकांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम केलंय ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी.

आंबेडकरनगर वसाहतीमधील घटनेची माहिती मिळताच रोहित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी समोरचे विदारक चित्रपाहून त्यांनी लागलीच मदतीचा हात पुढे करत, पिडीतांना कपडे तसेच साहित्याचे वाटप केले. तसेच कायम त्यांच्या सोबत राहण्याचा शब्द दिला.

आंबेडकरनगर वसाहतीमध्ये दाटीवाटीने घरे असल्यामुळे आग लागली तेंव्हा घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब पोहोचण्यास विलंब लागला. आग आटोक्यात आणण्यासाठी तीन तासांनंतर यश आले होते. मात्र तोपर्यंत नागरिकांना डोळ्यासमोर आपली घरे जळताना पाहावी लागली होती. दरम्यान, रोहित पवार यांनी यावेळी आपण येथील रहिवाशांच्या मागे कायम उभे असल्याचे सांगितले.

यावेळी पर्वती विधानसभा अध्यक्ष शशिकांत तापकीर, मा.नगरसेविका शशिकला कुंभार, युवकचे राकेश कामठे, महिला अध्यक्ष मृणालिनी वाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.