परीक्षा नियोजनाचे वाजले ‘तीन-तेरा’ ; पुणे विद्यापीठाचे शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर !

sppu

पुणे : अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या अडचणी अजून देखील संपलेल्या नसून परीक्षेच्या तोंडावर संभ्रमता वाढत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शिकेनुसार ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा होऊन निकाल लागणे अपेक्षित आहे. त्यानुसार पहिल्या आठवड्यात बॅकलॉग व त्यानंतर रेग्युलर विषयांच्या परीक्षांचे आयोजन केले जाईल असे सांगितले जात होते.

मात्र ऑक्टोबर महिना तोंडावर आला असतानाच अजूनही वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांना तयारी कशी करावी? असा प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे परीक्षांचा हंगाम असलेल्या एप्रिल-मे महिन्यातदेखील लॉकडाऊन करण्यात आले होते. अंतिम वर्षाच्या परिक्षा ऐन तोंडावर आल्या असताना शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करुन घेण्यासाठी संपाचं धोरण अवलंबलं आहे.

24 सप्टेंबरपासून राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर गेले आहेत. ‘सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जिवीत करण्यात यावी, सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा आणि इतर प्रलंबित मागण्या’, या मागण्यांच्या पुर्ततेचं जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाच्या शिक्षकेत्तर सेवक कृती समितीने घेतला आहे. तर, 1 ऑक्टोबरपासून विद्यापीठ बंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आहे.

अंतिम वर्ष परीक्षांसाठी प्रश्नसंच तयार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनाकडून सांगितले जात असले तरी परीक्षांची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे आता हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागून परीक्षांचे योग्य नियोजन व्हावे व वेळापत्रक विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे अशीच भावना प्रत्येक विद्यार्थी व पालकांची आहे.

महत्वाच्या बातम्या