सोशल मीडियावर पुणे विद्यापीठाला बदनाम केलं जातंय; पोलिसांकडे विद्यापीठाची तक्रार

uni pune1

पुणे : कोरोना महामारीच्या प्रभावामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. सुरुवातीला युजीसी आणि राज्य सरकारमधील परीक्षा घेण्यावरून झालेल्या संभ्रमानंतर अखेर अंतिम वर्ष परीक्षा या महिन्यात पार पडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आधीच परीक्षा घेण्यास झालेला विलंब व भविष्यातील अनिश्चिततेमुळं विद्यार्थी तणावात असतानाच विद्यापीठाच्या हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. त्या ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पार पडणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी सोयीस्कर पर्यायाची निवड केली. अनेक परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्यावी लागली. परीक्षांमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत असतानाच विद्यापीठाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची तक्रार देण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार करून अवैधरित्या परीक्षा कशी द्यावी, याबाबत सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ प्रसारित करून विद्यापीठास बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी तक्रार पुणे विद्यापीठाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दिली. 7 मिनिट 32 सेकंदाच्या या व्हिडीओद्वारे गैरप्रकार व कॉपी करण्यास प्रोत्साहन देण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

विद्यापीठ आणि विद्यापीठासाठी काम करणाऱ्या सेवा पुरवठादारांची व सर्व संबंधितांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे प्रचलित कायद्याचा भंग झाला आहे. यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी नोंदवली आहे.

महत्वाच्या बातम्या-