तलाव नाही हे आहे विद्यापीठाचे कँटीन 

पुणे: विद्येच्या माहेर घरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅन्टीनची अवस्था डबक्यासारखी झाली असून तेथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला आहे. नॅक कमिटीकडून ए+ मानंकन  मिळालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या रहदारीचे ठिकाण असलेल्या अनिकेत कॅन्टीनची अवस्था  परिसरात पावसाचे पाणी साचल्यामुळे पाणी डबक्यासारखी झाली आहे.

कॅन्टीनच्या परिस्थिती बाबत  प्रशासन आणि कॅन्टीनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून देखील ही समस्या सोडविण्याबाबत प्रशासन चिंताग्रस्त नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे. कॅन्टीनच्या परिसरात पाणी साचल्यामुळे तेथेच विद्यार्थ्यांना चहा नाष्टा करावा लागत असल्यामुळे दुर्गंधीसह इतर आजारांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे प्रशासनाने त्वरित याची दखल घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

“विद्यार्थ्यांच्या प्राथमिक सुविधांना कमी महत्त्व देत असल्याचे पुन्हा एकदा विद्यापीठाने सिद्ध केले आहे. बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची मुख्य जबाबदारी विद्यापीठावर असून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रश्न फक्त कॅन्टीनमध्ये पाणी साचल्याचा नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयक दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या इतर सोयीसुविधांचादेखील प्रश्न आहे. – ऋषिकेश दिवेकर( नव समाजवादी पर्याय)

”विद्यापीठाने नॅक येणार म्हणून विद्यापीठाच्या सुशोभिकरणावर अधिक खर्च केला. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक गोष्टींवर खर्च करत नाही. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या प्राथमिक सुविधांवर अधिक भर देऊन त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.” – प्रकाश रणसिंग, (विद्रोही संघटना)

“सध्या पावसाचे दिवस असल्याने आजारी पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे विद्यापीठ व कॅन्टीन चालकांनी कॅन्टीनसारखे ठिकाण डबके होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे. कॅन्टीनचे कित्येक खाद्यपदार्थ देखील गुणवत्तापुर्ण नसून आरोग्यासाठी हानीकारक आहेत, याचीसुद्घा दखल प्रशासनाने घ्यायला हवी.”- नसीर शेख(SFI)