मूलभूत अधिकारांतर्गतच विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी – विनोद तावडे

पुणे विद्यापीठ शेलारमामा सुवर्णपदक वाद शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणा-या शेलारमामा सुवर्णपदकासाठी तो विद्यार्थी शाकाहारी असावा अशी अट असेलेले परिपत्रक विद्यापीठाने जारी केले असले तरीही हा निर्णय २००६ मध्ये घेण्यात आला असून तो जुना आहे, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले आहे. कोणत्याही विद्यापीठाने विद्यार्थ्यांना कोणतीही शिष्यवृत्ती वा पदक देताना घटनेतील मूलभूत अधिकाराला बाधा न येता विद्यार्थ्याची निवड करावी, अशा स्पष्ट सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या असल्याचे तावडे यांनी सांगितले.

देणगीदाराकडून पुरस्कृत करण्यात येणारी कोणतीही शिष्यवृत्ती वा पदक यासाठीच्या निकषासाठी विषमता निर्माण करणारी कोणतीही अट कोणत्याही विद्यापीठाने स्वीकारू नये, असेही सर्व विद्यापीठांना कळविण्यात आले आहे. देणगीदार पुरस्कृत पदक व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड करताना घटनेने जे मुलभूत अधिकार दिले आहेत त्यामध्ये भेदभाव न करता मूलभूत अधिकारांतर्गतच विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठाकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती अथवा पदकासाठी कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता त्याची निवड केवळ गुणवत्तेच्या आधारे करण्यात यावी अशा सूचना प्रत्येक विद्यापीठाला देण्यात आल्याचे तावडे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

You might also like
Comments
Loading...