विद्यापीठ निवडणुकीत रंगणार राजकीय आखाडा

टीम महाराष्ट्र देशा – विद्यापीठ पातळीवर पुन्हा एकदा सुरु झालेल्या निवडणुकांमध्येही आता राजकीय आखाडा रंगणार आहे. संस्थाचालकांच्या प्रतिनिधित्त्वासाठी एकीकडे सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू हे देखील रिंगणात उतरले आहेत.

पदवीधरसाठी 61 तर संस्थाचालकांसाठी 61 असे एकूण 82 अर्ज आतापर्यंत आले असल्याची माहिती उपकुलसचिव विकास पाटील यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या अधिसभा निवडणुकीसाठी अधिसभेवर सहा मान्यताप्राप्त संलग्न महाविद्यालये, परिसंस्थांच्या व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे.

तर दहा पदवीधरांची निवड केली जाणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची तारीख 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर आहे. गुरुवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून आतापर्यंत 82 अर्ज आले असल्याची माहिती विकास पाटील यांनी दिली. यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला आहे तर मुख्यमंत्र्यांच्या बंधुंचे नाव व कोणत्या संस्थेतर्फे अर्ज भरला आहे याची माहिती देण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून असर्थता दर्शविण्यात आली.

तसेच पदवीधरमध्ये माजी पोलिस अधिकाऱ्यांचे चिरंजीव अभिषेक बोके यांनीही अर्ज भरल्याचे समजते आहे. विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार संस्थाचालक प्रतिनिधींमध्ये 17 अर्ज हे खुल्या वर्गातून असून 2 अर्ज हे महिलांचे आहेत. तर पदवीधरमध्ये खुल्या वर्गातून 30, महिलावर्गातनू 3, एससीमधून 10, एसटी प्रवर्गातून 2, ओबीसी प्रवर्गातून व डीटी आणि एनटी प्रवर्गातून 9 अर्ज आले आहेत.