सिनेटच्या निवडणुकीतून २० जणांची माघार

टीम महाराष्ट्र देशा –   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा अर्थात सिनेट निवडणुकीत एकूण 20 जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. व्यवस्थापनाच्या खुल्या व महिला गटातून निलीमा पवार यांचा झालेल्या सुनावणीत अर्ज वैध ठरूनही त्यांनी अर्ज मागे घेतल्याने सुनेत्रा पवार यांच्या विजयावर शिक्‍कामोर्तब झाला. व्यवस्थापन गटातील सर्व जागा बिनविरोध करण्याच्या शिक्षणसंस्था प्रमुखांना यश आले नाही. त्यामुळे आता सिनेटच्या व्यवस्थापनच्या 4 जागांसाठी 7 उमेदवारांमध्ये तर पदवीधरच्या 10 जागांसाठी 37 उमेदवारांमध्ये यंदा चुरस आहे. या निवडणुका विद्यापीठ विकास मंच, एकता पॅनेल आणि विद्यापीठ प्रगती पॅनेल या गटांत निवडणूक होणार आहे

विद्यापीठात व्यवस्थापन गटातील सहा जागा शिक्षणसंस्था प्रमुखांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठानचे सोमनाथ पाटील, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे शामकांत देशमुख, अभिनव एज्युकेशन सोसायटीचे राजीव जगताप, कमला एज्युकेशन सोसायटीच्या दीपक शहा, नाशिकच्या प्रवरा शिक्षण संस्थेचे राजेंद्र विखे-पाटील, गोदावरी शिक्षण मंडळाचे अशोक सावंत यांच्यात निवडणूक होणार आहे. यातील 4 जागांसाठी 7 उमेदवारांमध्ये चुरस आहे. महिला गटातून सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर अनुसूचित गटातून राजेंद्र कांबळे यांचा अर्ज अवैध ठरल्याने ही जागा रिक्‍त राहिली आहे.]

दरम्यान, विद्यापीठात व्यवस्थापन गटातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेवटच्या तासापर्यत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. संदीप कदम, निर्मला पवार, विकास काकतकर, किरण शाळिग्राम, राजेंद्र विखे-पाटील, दीपक शहा आदी संस्थाप्रमुख व विद्यापीठ विकास मंचाचे ए. पी. कुलकर्णी यांची बैठक झाली. मात्र संस्थाचालकांत कोणी माघार घ्यायची, कोणी नाही यावरून एकमत होऊ शकले नाही. शेवटी निवडणुकीला सामोरे जावे, असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, निर्मल पवार, महेश ढमढेरे आणि हेमंत धात्रक यांनी आज अर्ज मागे घेतले.गेल्या निवडणुकीत प्रोगेसिव्ह एज्युकेशनच्या डॉ. गजानन एकबोटे, प्रवरा शिक्षण संस्थेचे राजेंद्र विखे-पाटील व मराठा प्रसार मंडळच्या निर्मला पवार यांनी एकत्रितपणे निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत मात्र राजेंद्र विखे-पाटील बाहेर पडले आहेत.

आता विद्यापीठ विकास मंच व एकता पॅनेलने अधिकृतपणे व्यवस्थापन गटाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात शामकांत देशमुख, दीपक शहा आणि सोमनाथ पाटील यांचा समावेश आहे. संस्थाचालकांमध्ये एकमत न झाल्याचा परिणाम पदवीधर गटाच्या निवडणुकीवर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.