ई-चालान ठरतेय पुणे वाहतूक पोलिसांसाठी ‘पांढरा हत्ती’; दंडाच्या १३ कोटींची वसुली बाकी

pune traffic rule violence e cnallan system

विरेश आंधळकर: पुणे शहरातील बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून संपूर्ण शहरात ‘तिसऱ्या डोळ्याने’ म्हणजेच १२३० सीसीटीव्हीवरून लक्ष ठेवल जात आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आता थेट त्यांच्या घरीच दंडाची पावती पोहचवली जाते. त्याचप्रमाणे एखाद्या चालकाला वाहतूक पोलिसांनी नियम मोडताना पकडल्यास अनेकांकडून पैसे नसल्याचे कारण दिले जाते,

यावर जालीम उपाय म्हणून आता ई-चालानद्वारे दंड आकारला जात असून ऑनलाईन तसेच शहरातील व्होडाफोन कंपनीच्या स्टोअरमध्ये दंड भरण्याची सुविधा देण्यात येत आहे. मात्र हीच गोष्ट पुणे पोलिसांसाठी पांढरा हत्ती ठरताना दिसत आहे. कारण अशा पद्धतीने आकारला जाणारा तब्बल १३ कोटींचा दंड वसूल झालेला नाही.

पुणे पोलिसांकडून २९ मार्च रोजी ई-चालान सिस्टीम कार्यरत करण्यात आली तर सीसीटीव्ही मार्फत नजर ठेवण्यासाठी १९ ऑगस्ट ला कंट्रोल रूमची सुरुवात केली गेली. सीसीटीव्ही असणाऱ्या ठिकाणी नियम मोडणाऱ्यांना एसएमएसद्वारे दंडाच्या रकमेची माहिती दिली जाते.

पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडताना पकडल्यास थेट डेबिट-क्रेडीट कार्डद्वारे दंडाची रक्कम वसूल केली जाते. मात्र गेल्या सहा महिन्यापासून एकूण १३ कोटी रुपये दंडाची वसुली झालेली नाही. यामध्ये ७ कोटी ४९ लाख हे सीसीटीव्हीच्या आधारे बजावण्यात आलेल्या दंडाचे असून ५ कोटी ७७ लाख हे क्रेडीट कार्डद्वारे रस्त्यावर वसूल केल्या जाणाऱ्या दंडाचे आहेत.

या विषयावर ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना वाहतूक उपायुक्त अशोक मोराळे म्हणाले कि, “पोलिसांकडून आपल्या बाजूने कारवाई केली जात आहे. सीसीटीव्हीच्या आधारे वाहतुकीचे नियम मोडताना पकडल्यास अशा व्यक्तीला एसएमएस पाठवला जातो मात्र लोक त्याला दाद देत नाहीत. एखाद्या चालकाने पहिला दंड भरला नसल्यास पुन्हा नियम मोडताना आढळल्यास दोन्ही वेळेचा दंड लगेच वसूल केला जात आहे. मात्र, तरीही प्रतिसाद न दिल्यास अशा व्यक्तीला नोटीस बजावली जाते.