पुण्यात प्लास्टिक बंदी कारवाई विरोधात आज व्यापाऱ्यांचा बंद

पुणे: प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करताना बेकायदेशीर कारवाई करून दंड वसूल केला जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात आहे . या निषेधार्थ आज शहर व उपनगरातील किरकोळ व्यापाऱ्यांकडून एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

सोमवारी सकाळी 11 वाजता व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ महापालिकेचे आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाणार आहे. यावेळी व्यापाऱ्यांवर होत असलेल्या चुकीच्या कारवाईची माहिती त्यांना दिली जाणार आहे. महापालिकेकडून याची योग्य ती दखल घेतली जाईल अशी अपेक्षा आहे. परंतु, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास मंगळवारपासून (26 जून) व्यापारी बेमुदत बंद पुकारणार असल्याच ही निवंगुणे यांनी सांगितले .

शहरातील कोथरुड, वारजे माळवाडी, सिंहगड रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर, सर्व पेठ भाग, गोखलेनगर, वडगावशेरी, चंदननगर आदी उपनगरातील व्यापारी संघटनांच्या रिटेल व्यापारी प्रतिनिधींची रविवारी बैठक झाली. यामध्ये सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे