आळंदी येथील साई मंदिरातील दुर्गामातेच्या मूर्तीची चोरी

आळंदी : आळंदी येथील साई मंदिरातून चार लाख रुपये किंमतीची दुर्गामातेची मूर्ती चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वडमुखवाडी-चऱ्होली येथे साई मंदिर आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास येथील साई मंदिराच्या आत असलेल्या दुर्गामातेची चार किलो वजनाची पितळी मूर्ती चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरून नेली.

वसंत विठोबा गुंडपीकर यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथे साई मंदिर आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास येथील साई मंदिराच्या आत असलेल्या दुर्गामाता मंदिराच्या गाभा-यातील देवीची मूर्ती चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पगारे हे अधिक तपास करीत आहेत.