पुणे: हॉटेल चालकाची मुजोरी, तरुणांनी स्लीपर घातल्याने काढले हॉटेल बाहेर

 टीम महाराष्ट्र देशा : पुण्यात एक अजब गोष्ट नुकतीच घडली.  आता हॉटेल मध्ये जातांना कोणते कपडे परिधान करायचे यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. याच विषयावरून पुण्यातील एका हॉटेल मध्ये वाद झाले.  हॉटेलमध्ये आलेल्या तरुणांनी हाफ पँट आणि स्लीपर घातल्याने हॉटेल प्रशासनाने त्यांना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला.  अशाप्रकारचे कपडे घालणे हॉटेलच्या नियमावलीत बसत नसल्याने या तरुणांना बाहेर काढण्यात आले.  सेनापती बापट रस्त्यावरील ‘एजंट जॅक’ या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून त्यामुळे आता ग्राहकांनी कोणते कपडे आणि पादत्राणे घालायची हेही हॉटेलचालक ठरवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.  ही घटना एक दोघांसोबत नाही तर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलेल्या संपूर्ण ग्रुपसोबतच घडली.

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमध्ये हे हॉटेल असून काही तरुण मंगळवारी रात्री जेवण्यासाठी या हॉटेलमध्ये आले.  त्यावेळी या मुलांनी हाफ पँट आणि पायात स्लीपर घातल्याचे कारण पुढे करत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याबाबत आपण आपल्या हॉटेलमध्ये नियमावलीही लावली असल्याचे हॉटेलच्या संचालकाने सांगितले.  तुम्ही केलेला वेश आमच्या हॉटेलमधील सुविधा घेण्यास योग्य नसल्याने तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.  हे सगळे तरुण कॉम्पुटर इंजिनियर असून ते नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात.

याबाबत तरुणांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आली आहे.  संबंधित हॉटेल चालकांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी या तरुणांनी केली आहे.  अशाप्रकारचे खासगी गोष्टींबाबतचे नियम लावणे हे मुलभूत हक्कांवर गदा आणणारे असल्याने या गुन्ह्याची नोंद व्हावी असे मत यातील एका तरुणाने व्यक्त केले.  हॉटेलने लावलेल्या नियमावलीत ग्राहकांनी कोणता वेश करावा याबरोबरच याठिकाणी बॉलिवूड गाणी वाजविता येणार नाहीत असाही नियम देण्यात आला आहे. याशिवायही अनेक अजब नियम यामध्ये देण्यात आले आहेत.

मटन भाकरीची रांगड़ी मेजवानी म्हणजेच हॉटेल जय भवानी….!

हलाल सिनेमाच्या फलकांना अवामी विकास पार्टी च्या कार्यकर्त्यांनी फासले काळे