तुकाराम मुंढेना नकारात्मक प्रसिद्धीची आवड

मुंढे विरोधात सत्ताधाऱ्यांसह विरोधक एकत्र

पुणे – पुणे महानगर परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी शालेय बस पासच्या अचानक केलेल्या दरवाढीमुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या रडारवर आले आहेत.

तुकाराम मुंढे यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या बस पासच्या शुल्कात अचानक वाढ केली. वाढीव दराने अनेक शाळांनी ह्या बस घेण्यास नकार दिला. त्यामुळे शाळांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना याचा फटका बसला होता. दरवाढीचा निर्णय घेताना मुंढे यांनी पीएमपीएल संचालक मंडळ अथवा महापालिका पदाधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा नसल्याचा आरोप आता केला जात आहे. मंगळवारी शिवसेनेन विद्यार्थ्यांना सोबत घेत महापालिका सभागृहात बाहेर आंदोलन केल.  याच विषयाचा संदर्भात महापालिका सभागृहात बोलताना सर्वपक्षीयांनी मुंढेवर चांगलाच शाब्दिक हल्ला करत मुंढे एकाधिकार शाहीने कामकाज करत असल्याचा आरोप केला आहे.

सिद्धार्थ धेंडे – उपमहापौर
तुकाराम मुंढे हे मनमानी करत असून शालेय बस पासच्या दरवाढीचा एकतर्फी निर्णय घेताना त्यांनी कोणालाच माहिती दिली नाही. महापालिका बस पाससाठी पीएमपीएलला अनुदान देते त्यामुळे त्यांनी संचालक मंडळाशी चर्चा करायला हवी होती.

वसंत मोरे  – गटनेते मनसे 
अनेक वर्षांपासून महापालिकेने विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र या निर्णयालाच छेद देण्याचा प्रयत्न मुंढेंनी केला आहे. तुकाराम मुंढे एकाधिकारशाही करत असून ते महापौरांचही ऐकत नाहीत. अधिकारी कितीही कार्यक्षम असला तरी त्यांनी जनभावना समजून घेतली पाहिजे.

अरविंद शिंदे – गटनेते काँग्रेस 
तुकाराम मुंढेना नकारात्मक प्रसिद्धीची आवड आहे. बस पासवाढीच्या विषयी सभागृहात चर्चा करून मुंढेना प्रसिद्धी न देता सभागृहाने निर्णय करावा. मुंढे सभागृहात येत नाहीत आणि त्यांना सभागृहाला उत्तर देण्याची इच्छा नसल्याच दिसत आहे.

चेतन तुपे – विरोधीपक्ष नेते.
पीएमपीएलमध्ये महापालिकेचे 60 टक्के शेअर असताना ही तुकाराम मुंढे महापालिका पाडाधिकाऱ्यांचं ऐकत नाहीत, ते आपल्याच लहरी पणावर निर्णय घेत आहेत. नियमानुसार महापौर तसेच संचालक मंडळाशी चर्चा करून पास दरवाढीचा निर्णय घेयला हवा होता.