बँक ऑफ महाराष्ट्राच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक; पोलिसांच्याच अडचणीत वाढ!

Maharashtra-Police

पुणे: नियमबाह्य पद्धत अवलंबून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कर्ज दिल्या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक करणारे पोलिसाच आता अडचणीत सापडले आहेत.

‘एमपीआयडी’ कलमाखाली पुणे पोलिसांनी बँकेच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाई केली खरी, परंतु कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेच्या आजी-माजी अध्यक्षाविरुद्ध कारवाई करत असताना याची पुर्व कल्पना रिझर्व्ह बँकेला देणं आणि त्यांची रितसर परवानगी घेणं बंधनकारक असतं. मात्र, पुणे पोलिसांनी अशी कोणतीही खबरदारी न घेताच कारवाई केली. यामुळं हे प्रकरण आता पोलिसांच्या चांगलेच अंगलट येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

त्याचबरोबर पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवाई करण्याआधी महासंचालक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांना पूर्व सूचना देणे बंधनकारक असते, पण तसे झाले नाही. एवढी मोठी कारवाई करण्याआधी पुणे पोलिसांनी गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कोणतीही माहिती न देता कारवाई केल्याने मुख्यमंत्री नाराज झाले आहे. या सर्व घटनेने पुणे पोलिसांच्याच अडचणीत वाढ होताना सध्या तरी दिसत आहे.