पुण्यात प्राणीमित्रांच्या सतर्कतेने पशुबळी देण्याचा डाव उधळला

पुणे: महाराष्ट्रामध्ये पशुबळीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र आजही काही ठिकाणी देवाच्या नावावर पशुबळीची प्रथा सुरु असल्याच दिसत आहे. पद्मावती परिसरात असाच एक प्रकार समोर आला असून मेसाई देवीच्या पुजेनिमित्त दोन रेड्यांचा बळी देण्याचा डाव प्राणीमित्रांच्या सतर्कतने हाणून पाडला आहे. देवीला बळी देण्यासाठी आणलेले दोन रेडे, बळी देण्यासाठी आणलेली हत्यारे, दोरखंड, दोन कु-हाडी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते अमित शहा यांना काल शुक्रवारी रात्री काही लोक वनशिव वस्ती परिसरात रेड्यांचे बळी देणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान शहा यांनी खातरजमा केली असता संबंधित ठिकाणच्या मोकळ्या मैदानात काही लोकांनी तंबू टाकल्याचे दिसून आले. तर तंबूसमोर हळदी कुंकू वाहून गळ्यात हार घातलेले दोन रेडे बांधले होते. हा सर्व प्रकार समोर येताच त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता ते रेडे बळी देण्यासाठीच आणल्याच उघड झाल आहे. दरम्यान या प्रकरणी पीटर पवार (वय-45) याला अटक करण्यात आली आहे.