koregaon bhima violence; पोलिसांची कारवाई म्हणजे भिडे एकबोटेंना वाचवण्याचं षडयंत्र

पुणे: १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये ३१ डिसेंबरला शनिवार वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग,माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना नागपूर आणि दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.’

दरम्यान यानंतर एल्गार परिषदेच्या वतीने पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आलाय, भीमा कोरेगाव दंगलीशी एल्गार परिषदेचा संबंध नाही. पोलिसांनी केलेल्या अटकेचा आम्ही निषेध करत आहोत.भीमा कोरेगावची दंगल नक्षलवाद्यांनी घडवली असं दाखवण्याचं षडयंत्र आहे. भिडे एकबोटेंना वाचविण्याचा हा प्रयत्न आहे.भिडेंचे मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्या सोबतचे संबंध उघड आहे त्यामुळे त्यांना वाचविणे आणि चळवळीला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे.