पुणे महापालिकेने रचला नवीन इतिहास कर्ज रोख्यातून उभारले 200 कोटी रुपये

पुणे शहरच्या समान पाणीपुरवठयासाठी महत्वपूर्ण असलेल्या 24×7 पाणी पुरवठा योजनेसाठी पुढील पाच वर्षात 2 हजार 264 कोटी रुपये कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत. सोमवारी यातील पहिल्या टप्यातील 200 कोटींचे कर्जरोखे शेअर बाजारात खुले करण्यात आले. प्रथमच याला गुंतवणूक दारांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून आता महापालिकेच्या तिजोरीत 200 कोटी रुपये जमा होणार आहेत.  याच बरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे उभारणारी पुणे महापालिका देशातील पहिली महापालिका बनली आहे.

महापालिकेला कर्ज रोखे तयार करण्यासाठी 21 कंपन्यांनी तयारी दर्शवली होती. त्यातील 2 कंपन्यांची निवड करण्यात आली असून प्रत्येकी 100 कोटी प्रमाणे उद्या महापालिकेच्या तिजोरीत 200 कोटी जमा होणार आहेत. यामुळे 24 तास पाणी पुरवठा योजनेला चालना मिळणार आहे. 22 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरसिकास मंत्री वैंकय्या नायडू, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्त टिळक यांच्या उपस्थितीत या कर्ज रोख्याची मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात येणार आहे. 2007 नंतर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे उभरणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली असून याबद्दल केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी ट्विट करत पुणे महापालिकेचे अभिनंदन केले आहे.