fbpx

पिच क्युरेटर साळगावकरांच्या स्टिंगमुळे क्रिकेटविश्वात खळबळ

pune-pitch

पुणे: पुण्यातील गहुंजे मैदानावर होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं स्टिंग ऑपरेशन ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने समोर आणलं आहे.या स्टिंगमध्ये बॅटिंगसाठी चांगलं पीच तयार करण्यासाठी पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख असल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आजची मॅच होणार कि नाही याबद्दल देखील संभ्रम निर्माण झाला आहे.

पत्रकाराने पिच क्युरेटरला आपल्या दोन खेळाडूंसाठी पिचमध्ये काही बदल करण्यास सांगितलं, त्यावर पांडुरंग साळगावकर लगेचच तयार झाले. जे पिच आम्ही तयार केलंय, त्यावर 337 धावसंख्या होऊ शकते. या आव्हानाचा सहजरित्या पाठलाग करता येऊ शकतो, असं पिच क्युरेटर म्हणाले.रिपोर्टरच्या सांगण्यावरुन पांडुरंग त्यांना पिच दाखवण्यासही तयार झाले. मात्र नियमानुसार, सामन्याआधी पिचवर कर्णधार आणि प्रशिक्षकाशिवाय कोणीही जाऊ शकत नाही. तसंच मी काही मिनिटांत पिचचं स्वरुप बदलू शकतो, असंही पिच क्युरेटर म्हणाले. इतकंच नाही तर खिळे असलेले शूज घालून पिचवर जाण्यासही त्यांनी परवानगी दिली.

बीसीसीआयनं आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने देखील या वृत्ताची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी करण्याची घोषणा केली आहे. तसंच जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु असंही म्हटलंय.दरम्यान पांडुरंग साळगावकरांच्या स्टिंगमुळे आज होणारी मॅचही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या सगळ्या प्रकारानंतर जंटलमन्स गेम समजला जाणाऱ्या क्रिकेटवर आणखी एक काळा डाग लागला आहे असंच म्हणावं लागणार आहे