पार्किंग धोरणाविरोधात पुण्यातील वातावरण तापले; विविध संघटनांची निदर्शने

पार्किंग धोरणाविरोधात कोणी मागितली भिक तर कोणी आणला घोडा

पुणे- शहरात नव्याने लागू करण्यात येणारे पार्किंग धोरण आज मुख्यसभेसमोर मांडले जाणार आहे, तत्पूर्वी संपूर्ण महापालिका परिसर आंदोलनांनी दणाणून निघाला आहे. पतित पावन संघटनेकडून बैल आणि घोडा गाडीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले तर संभाजी ब्रिगेडने भीक मांगो आंदोलन करत पार्किंग पॉलिसीचा विरोध केला आहे. यावेळी भीम आर्मी तसेच काँगेसकडूनही आंदोलन करण्यात आले.

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये पार्किंग धोरणाला मंजुरी देण्यात आल्यानंतर ते आज मुख्यसभेसमोर मांडले जाणार आहे. भाजप वगळता सर्वपक्षीयांचा पार्किंग शुल्क आकरण्यास तीव्र विरोध आहे. आंदोलनकर्त्या संघटनांनी यावेळी भाजपविरोधातील घोषणाबाजी करत हा परिसर दणाणून सोडला कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेड, हमारी अपनी पार्टी, भीम आर्मी, पतित पावन, आदी संघटनांनी आज निदर्शने केली.

वाहतुकीच्या दृष्टीने शिस्त लावण्यासाठी पार्किंग धोरण गरजेचं असल्याचं सत्ताधारी भाजपकडून सांगितलं जातं आहे, मात्र अशा प्रकारे पार्किंग शुल्क आकारून पुणेकरांच्या खिशावर डल्ला मारण्याच काम सत्ताधाऱ्यांकडून केलं जात असल्याची टीका विरोधक तसेच सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

प्रशासनाकडून सुचवण्यात आलेल्या दरांमध्ये ८० टक्क्यांनी कपात करत बहुमताच्या जोरावर या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणेकरांवर नव्याने कोणतेही कर लादले जाणार नसल्याच खुद्द भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले होते.

आजवर पुणे शहरामध्ये रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते, मात्र आता कोठेही गाडी पार्क करायची झाल्यास शुल्क द्यावे लागणार आहे.दरम्यान, आता सामान्य पुणेकर नागरिक आणि विरोधी पक्षांकडून याला विरोध केला जात आहे.

You might also like
Comments
Loading...