दक्षिण प्रवेशद्वारावर खड्डेच खड्डे

पुणे – राज्यातील महामार्गांवर एकही खड्डा नसल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र, शहराचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय महामार्ग सहावरील ‘कात्रज ते भिलारेवाडी’ रस्त्यावर प्रवाशांचे स्वागत या खड्ड्यांमधून होत असल्याचे वास्तव ‘सकाळ’च्या पाहणीत निदर्शनास आले.

पश्‍चिम महाराष्ट्रासह परराज्यामधून मुंबई, गुजरात तसेच विदर्भात जाण्यासाठी रहदारीचा रस्ता म्हणून कात्रज घाटातील पायथ्याजवळील महामार्ग ओळखला जातो. परंतु, डांबर उखडलेला रस्ता, मोठे खड्डे, ठिकठिकाणी साचलेला कचरा, राडारोडा आणि दुतर्फा अतिक्रमणांमुळे कात्रज ते भिलारेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी नेहमीची झाली आहे. तसेच, कमी उंचीच्या दगडी कठड्यांमुळे येथील प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. कात्रज येथून साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मांगडेवाडी, भिलारवाडी गावांदरम्यान रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर एसटी, खासगी प्रवासी वाहनांसह जड वाहतुकीची मोठी वर्दळ असते. मात्र खड्डे, राडारोडा, पथदिव्यांची कमतरता यामुळे येथील वाहतूक धोकादायक ठरत आहे. रात्री अपघातांची संख्याही जास्त आहे. सोबतच अनेक ठिकाणी रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे अनेकदा वाहने घसरून अपघात होतात. स्थानिक नागरिकांना मात्र याचा प्रचंड त्रास होत आहे. महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांचा प्रश्‍नदेखील दिवंसेदिवस गंभीर बनत चालला आहे.

मांगडेवाडी पेट्रोल पंपाच्या पुढील रस्ता हा उताराचा आहे. एका बाजूला नाला आणि दुसऱ्या बाजूला डोंगर, अशी स्थिती आहे. मात्र, नाल्याच्या बाजूने बांधलेल्या सुरक्षा कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. कमी उंचीमुळे हे ठिकाण अपघाती क्षेत्र झाले आहे. पेट्रोल पंपाजवळील पुलाजवळ हमखास अपघात होतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांनी खड्ड्यांबाबत दिलेली माहिती ही किती चुकीची आहे याचा प्रत्यय कात्रज- भिलारेवाडी रस्त्यावरून प्रवास करताना येतो. ‘शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतेच यासाठी आंदोलनही केले. तसेच, सोशल मीडियावर ‘सेल्फी विथ पॉटहोल’ ही मोहीम ही राबविण्यात आली. नागरिकांकडूनही त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मी कामानिमित्त नेहमी या रस्त्यावरून प्रवास करतो. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालवताना त्रास होतोच, मात्र यामुळे वाहतूक अतिशय संथ गतीने पुढे सरकते. अनेकदा वाहतूक कोंडीही होते. तसेच, पथदिवेही नसल्यामुळे रात्री वाहन चालवताना अडचण होते. रस्त्याची त्वरित दुरुस्ती झाली पाहिजे. तसेच, या ठिकाणी पथदिव्यांचीही सोय करण्यात यावी.

पन्नास कोटींचा निधी खड्ड्यांत

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या देखभालीखाली जिल्ह्यात १९ हजार ९८ किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ३.७५ मीटर रुंदीचे १६ हजार ४५४ किलोमीटरचे रस्ते ग्रामीण भागात आहेत. त्याखेरीज ७ मीटर रुंदीचे १ हजार २४६ किलोमीटर, साडेपाच मीटर रुंदीचे १ हजार २४६ किलोमीटर व अन्य १२० किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय व राज्य महामार्गांसह मुख्य जिल्हा आणि ग्रामीण रस्त्यांचा समावेश आहे. तसेच ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण’ (नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या रस्त्यांचाही त्यात समावेश आहे. सर्व रस्त्यांची उभारणी, देखभाल-दुरुस्तीसाठी अंदाजे ५० हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च झाला आहे. अनेक राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्थांकडून खड्डे बुजविणे, खड्ड्यात वृक्षारोपण, प्रशासकीय अधिकाऱ्यांना गुलाब देऊन गांधीगिरी अशी आंदोलने करून खड्ड्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यात आले; परंतु अद्यापही जिल्ह्यातील रस्त्यांची खड्डेमय अवस्था कायम आहे.Loading…
Loading...