fbpx

बेरोजगारीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक, युवक काँग्रेसने रोजगार नोंदणी कार्यालयाला ठोकले टाळे

टीम महाराष्ट्र देशा : वाढती बेरोजगारी कमी करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप करत, पुणे विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आज पुण्यातील रोजगार नोंदणी कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले.

केंद्र व राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीची धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रवीकांत वरपे आणि सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज पुणे येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला (एम्प्लॉयमेंट ऑफिस) टाळे ठोकण्यात आले.

विशेष म्हणजे, वाढत्या बेरोजगारीला कमी करण्यात राज्य व केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याच्या निषेधार्थ काल बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले. गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारला रोजगार निर्माण करता आले नाहीत. यामुळे बेरोजगारी वाढली आहे, युवकांना शिक्षण घेऊनही रोजगार नाही.यामुळे पुढे अधिक भयंकर परिस्थिती निर्माण होईल. असे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याप्रसंगी निषेध व्यक्त केला.