पुणे-मुंबई ‘बुलेट ट्रेन’ व खंडपीठ पुण्यातच व्हावे : संजय काकडे

sanjay kakde

पुणे- मुंबई दरम्यान उद्योग, व्यवसाय, नोकरी व इतर कामांमुळे प्रवास करणारांची संख्या मोठी आहे. दिवसाला सुमारे एक लाख लोक या दरम्यान प्रवास करतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याने एक्सप्रेस हायवेवर वाहनांची संख्या वाढत आहे. परिणामी अपघातांची संख्या वाढत आहे. या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास पुणे-मुंबई दरम्यान बुलेट ट्रेनची गरज आहे व ती सुरु करावी. तसेच, पुणे जिल्ह्यातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या दाव्यांचे प्रमाण हे 60 टक्के असून कोल्हापूरच्या तुलनेत ते अधिक आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यातच व्हावे, अशी मागणी केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांच्याकडे खासदार संजय काकडे यांनी केली आहे.

एका वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी यांनी पुणे शहर, जिल्हा व विभागातील विकास प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी प्रश्नोत्तरादरम्यान मी या मागण्या केल्या व त्या पूर्ण करण्यासाठी गडकरी साहेबांनी पुणेकर नागरिकांसाठी लक्ष घालावे, अशी विनंतीही त्यांना केली. यासंबंधी सकारात्मक प्रयत्न करेन असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.

एक्सप्रेस हायवेवर रहदारी वाढल्याने अपघात होऊन त्यात अनेकांना प्राण गमवावे लागताहेत तर, अनेकजण जखमी होऊन अपंग होत आहेत. पुणे-मुंबई बुलेट ट्रेन झाल्यास पुण्यातून एक्सप्रेस हायवे वरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होईल. ते बुलेट ट्रेनने अत्यंत कमी वेळेमध्ये पोहचतील, वाहनांची संख्या कमी झाल्याने अपघातकमी होतील आणि कामाचा वेगही वाढेल. पुणे व मुंबईमधील उद्योग-व्यवसायाला यामुळेही आणखी गती मिळेल, अशी यामागची भूमिका आहे असं काकडे यांनी सांगितलं.

पुणे व कोल्हापूर विभागातून मुंबई उच्च न्यायालयात जाणाऱ्या दाव्यांची संख्या पाहिल्यास 60 टक्के दावे हे पुण्यातील आहेत. त्यामुळे पुण्यात खंडपीठ होणे ही गरज आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजाला गती मिळेल. अशी भूमिका काकडे यांनी यावेळी मांडली.