पुणे मेट्रोचं भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते करणार : काँग्रेस

पुणे : पुणे मेट्रोच्या भूमीपूजनावरुन भाजप-राष्ट्रवादीतला वाद शमत नाही तोवरच आता काँग्रेसने यात उडी घेतली आहे. पुण्यात स्वारगेट येथे काँग्रेसकडून 23 डिसेंबरलाच मेट्रोचं भूमीपूजन करण्यात येईल, असं वक्तव्य पुण्याचे काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला पुणे मेट्रोचं भूमीपूजन करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसने मेट्रोच्या भूमीपूजनावरुन भाजप आणि राष्ट्रवादीला शह देण्यासाठी नवी खेळी आखली आहे.

पुणे मेट्रोला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मान्यता मिळाली होती. पुण्यात मेट्रो आणण्याच्या निर्णयात त्यांचा महत्वाचा वाटा आहे, असा दावा रमेश बागवे यांनी केला आहे. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते 23 डिसेंबरला सकाळी 10 वाजता काँग्रेसकडून भूमीपूजन करण्यात येईल, असं बागवे यांनी सांगितलं.