fbpx

पुणे मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा अटलाव डेबेबे विजेता

पुणे – 33वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा काल झाली. यंदाही या स्पर्धेत इथिओपियाच्या खेळाडूंचंच वर्चस्व होतं. पूर्ण मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा अटलाव डेबेबे; तर महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये केनियाच्या पास्कालिया चेप्कोगेइ नं विजेतेपद पटकावलं. भारतीय गटात बीईजीचा करण सिंग आणि महिला गटात उर्वी तांबे विजयी ठरले.

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही क्रीडाविश्वात मानाची समजली जाते. मात्र यंदाची मॅरेथॉन स्पर्धा गाजली ती ढिसाळ नियोजनामुळे, महापालिकेनं निधीमध्ये केलेली कपात आणि वाहतुकीचा उडालेला बोजवारा यामुळे धावपटुंना फिनिश पॉईंटपर्यत पोहोचण्यासाठी वाहतुकीच्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा स्पर्धेला लवकर म्हणजेच पहाटे पाच वाजता सुरु झाली. थंड हवामानामुळे स्पर्धकांची कामगिरी सरस होईल अशी अपेक्षा होती, मात्र याचा फायदा धावपटुंना घेता आला नाही. यंदा स्पर्धेंवर इथिओपियाच्याच धावपटुंचंच वर्चस्व होतं. भारतीय स्पर्धकांनाही फारशी चमक दाखवता आली नाही. स्पर्धेंत शंभर परदेशी धावपटुंसह 15 हजार धावपटुंनी भाग घेतला. विजेत्यांनी तीस लाख रुपयांपर्यंतची बक्षिसं देण्यात आली.